डोंबिवली – येथील पूर्व भागातील चिपळूणकर रस्त्यावरील डाॅमिनोज पिझ्जा दुकानात या दुकानातील कामावरून काढून टाकलेल्या नोकरानेच चोरी केले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. रामनगर पोलिसांनी चोरीनंतर २४ तासांच्या आत आरोपीला डोंबिवलीतील गोग्रासवाडी भागातून अटक केली.

विजय अशोक मन्तोडे (२९, रा. अनंत निवास, संत नामदेव पथ, गोग्रासवाडी, डोंबिवली पूर्व) असे आरोपीचे नाव आहे. विजयला दारूचे व्यसन असल्याने गेल्या वीस दिवसांपूर्वी डाॅमिनोज पिझ्झाच्या मालकाने त्याला कामावरून काढून टाकले होते, असे पोलिसांनी सांगितले. दारूसाठी अनेकजणांकडून विजयने उसने पैसे घेतले आहेत. ते परत करावेत म्हणून नागरिक त्याच्याकडे पाठपुरावा करत आहेत. आता नोकरी नाही, कमाईचे साधन नसल्याने लोकांचे उधारीचे पैसे कोठून द्यायचे असा प्रश्न विजयसमोर होता. विजयने आपली पैशाची गरज भागविण्यासाठी डाॅमिनोझ पिझ्झामध्ये चोरी करण्याचे ठरविले.

हेही वाचा – डोंबिवली पूर्व भाजपा मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा

सोमवारी मध्यरात्री विजय पायजमा, कुर्ता घालून, चेहरा झाकून दुकानाच्या बाहेर येरझऱ्या मारू लागला. परिसरात कोणीही नाही पाहून त्याने कटावणीच्या साहाय्याने डाॅमिनोजचे मुख्य प्रवेशव्दार उघडले. दुकानात गेल्यानंतर त्याला ग्राहक मिळकतीचा पैसा मालक कोठे ठेवतो हे माहिती होते. त्याने दुकानातील तिजोरीच्या खोलीत जाऊन ती फोडून त्यामधील ८० हजारांची रक्कम चोरून नेली होती.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांवर आरोप करणाऱ्याला अटक; आरोप निराधार असल्याचा ‘प्रशांत कॉर्नर’चा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा प्रकार कैद झाला होता. चेहरा दिसत नसलेला चोरट्याच्या हालचाली विजयसारख्याच असल्याने त्याच्यावर पोलिसांचा संशय होता. परिसरातील सीसीटीव्हीमध्ये विजय रस्त्यावर येरझऱ्या मारत असल्याचे दिसत होते. रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, हवालदार सचिन भालेराव, विशाल वाघ, हनुमंत कोळेकर, शिवाजी राठोड यांनी चोरट्याचा शोध सुरू केला.
चोरटा विजयला डोंबिवलीतील गोग्रसावाडी भागातून ताब्यात घेतले. विजयची कसून चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून ८० हजारापैसी ४८ हजार रुपयांची रक्कम पोलिसांनी परत मिळवली आहे. दारुचे व्यसन, कर्जफेडीसाठी त्याने ही चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले.