कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत मंगळवारी सात दिवसांच्या २४ हजार ५७२ गणपतींचे शहराच्या विविध भागातील कृत्रिम तलाव, गणेशघाटांवर विसर्जन करण्यात आले. यामध्ये १६ हजार ६९ प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आणि शाडूच्या आठ हजार ५०३ गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

शासनाच्या निर्देशानुसार सहा फुटा पेक्षा कमी उंचीच्या गणेशमूर्तींचे गणेशभक्तांनी पालिकेच्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात यावे, असे आवाहन कल्याण डोंबिवली पालिकेने मागील दोन महिन्यांपासून केले होते.

पालिकेच्या या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. विसर्जन स्थळी संकलित केलेल्या शाडुच्या मूर्ती डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील बंदिस्त क्रीडा गृहात शेळवण्यासाठी आणल्या जातात.

सात दिवसांच्या गौरी गणपती विसर्जनाच्या माध्यमातून पालिकने शहराच्या विविध भागातील निर्माल्य कलश, गणेशघाट या भागातून एकूण ६८ टन निर्माल्य जमा करण्यात आले. हे निर्माल्य श्री गणेश मंदिराच्या एमआयडीसीतील खत प्रकल्प, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, पालिकेचा बायोगॅस प्रकल्प आणि खत प्रकल्प येथे पाठविण्यात येणार आहे.