कल्याण : समाज माध्यमांतील एका दृश्यचित्रफितीच्या माध्यमातून कल्याणमध्ये मुरबाड, भिवंडी परिसरातील धनदांडग्या कुटुंबातील सात तरूणांनी मागील पाच महिन्याच्या काळात एका सतरा वर्षाच्या तरूणी बरोबर सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दाखल होताच, पोलिसांनी सातही तरूणांना अटक केली आहे. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात पोलिसांनी या तरूणांना हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती, अशी ही तरूणी महाविद्यालयीन शिक्षण घेते. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या तरूणीची एका तरूणा बरोबर ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत या अल्पवयीन तरूणीशी तरूणाने शरीर संंबंध प्रस्थापित केले. याविषयीच्या अश्लील दृश्यध्वनी चित्रफिती तयार केल्या. या तरूणाने या दृश्यध्वनी चित्रफिती साखळीप्रमाणे आपल्या एका मित्राकडून दुसऱ्या मित्राकडे अशा पध्दतीने सात जणांकडे पाठविल्या. या दृश्यध्वनी चित्रफितींचा वापर करून हे तरूण पीडितेला त्रस्त करून तिच्याशी शारीीरिक संबंध प्रस्थापित करत होते. तरूणीने त्यांना नकार दिला तर या चित्रफिती समाज माध्यमांत प्रसारित करण्याच्या धमक्या हे तरूण पीडितेला देत होते. मागील पाच महिन्यांपासून हे तरूण हा सगळा प्रकार करत होते. या सगळ्या प्रकाराने पीडित त्रस्त होती. ती कोणाला काही सांगू शकत नव्हती.

समाज माध्यमांतील या तरूणीच्या अश्लील दृश्यध्वनी चित्रफिती पीडितेच्या कुटुंबीयांना बाहेरून समजल्या. तेव्हा कुटुंबीय हादरले. त्यानंतर पीडितेने आपल्या बाबतीत घडत असलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. पीडितेला त्रस्त करणारे तरूण हे धनदांडग्या कुटुंबातील असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी सांगितले, पीडितेची ओळख सुरूवातीला एप्रिलमध्ये राहूल भोईर या तरूणा बरोबर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली. ओळखीतून प्रेम आणि त्यांच्यात शरीर संबंध निर्माण झाले. राहुल पीडितेबरोबर लैंगिक अत्याचार करताना त्याची दृश्यचित्रफित तयार करत होता. या चित्रफिती नंतर राहुलकडून देवा पाटील, अजित सुरवसे, गौरव सुरवसे, हर्षल पोळसे, जयेश मोरे, किरण सुरवसे यांच्यापर्यंत पोहचल्या. या चित्रफिती समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन हे तरूण पीडितेवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार करत होते. हे तरूण मुरबाड, भिव्ंडी परिसरातील सुस्थितीत कुटुंबातील आहेत, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.

या पाच महिन्याच्या काळात पीडिता एक वेळ गर्भवती राहिली होती. ती खूप मानसिक तणावाखाली होती. कुटुंबीय तिला काय झाले विचारत होते पण ती भेदरलेली होती. मागील पाच महिन्यांपासून पीडिता या तरूणांकडून होणाऱ्या त्रासापासून त्रस्त होती. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने या तरूणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.