उल्हासनगरः उल्हास नदीतील जलपर्णी काढण्याच्या निमित्ताने सक्रीय झालेल्या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने आता उल्हास आणि वालधुनी नदीच्या पात्रात मिसळणाऱ्या सांडपाण्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण शहरातील नाल्यांमधील सुमारे ७० नमुने घेण्यात आले आहेत. या सांडपाण्यामध्ये नेमके कोणते घटक आहेत हे तपासले जाणार आहेत.

ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली उल्हास नदी दरवर्षी जलपर्णीने व्यापली जाते. नदीच्या पात्रावर जलपर्णीचे मोठे आच्छादन पाहायला मिळते. तर उल्हासनगर शहरातून वाहणारी वालधुनी नदी प्रदुषणामुळे गटारगंगा झाली आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांची अवस्था बिकट आहे. या दोन्ही नद्यांच्या संवर्धनासाठी पर्यावरणप्रेमी सातत्याने आंदोलन करून प्रदुषण प्रशासनाच्या निदर्शनास आणून देतात. मात्र शासकीय उदासिनतेमुळे उल्हास नदी गटारगंगा होण्याचा वाटेवर आहे. त्यामुळे नागरिक आणि पर्यावरणप्रेमींच्या रेट्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींसह शासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत.

उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने यंत्रे उतरवून जलपर्णी काढण्यास सुरूवात केली. त्यासोबतच आता उल्हास नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी शासकीय यंत्रणांनीही पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचे स्त्रोत शोधण्यासाठी सध्या पालिका स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्यातच अशा स्त्रोतांमधून कोणत्या दर्जाचे सांडपाणी उल्हास नदी आणि वालधुनी नदीत मिसळते आहे याचाही तपास आता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून केला जाणार आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर ते कल्याण या भागातील ७० सांडपाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. येत्या काही दिवसात या सांडपाण्याच्या नमुन्याेच परिक्षण होऊन त्यातील घटकांची माहिती मिळेल, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या पाहणीनंतर नाल्यात कोणत्या प्रकारचे आणि कोणते घटक असलेले सांडपाणी मिसळते हे समोर येणार आहे.

ठिकठिकाणी सांडपाणी नदीत

बदलापूर ते कल्याण या पट्ट्यात उल्हास नदीत विविध ठिकाणी नाल्यांच्या माध्यमातून सांडपाणी नदीत मिसळते आहे. दररोज लाखो लीटर सांडपाणी हे नदीत मिसळत असून त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. बदलापुरातल्या नाल्यांमधून रासायनिक सांडपाणी उल्हास नदीत मिसळत असल्याची बाब काही दिवसांपूर्वी पर्यावरणप्रेमी शशिकांत दायमा यांनी निदर्शनास आणून दिली होती. तर नागरी सांडपाणीही ठिकठिकाणी मिसळते आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनीही ग्रामीण भागातील अशा नाल्यांची पाहणी केली होती.