ठाणे – कधीही साथ न सोडणारी सावली येत्या शनिवारी काही काळासाठी आपली साथ सोडणार आहे. शून्य सावली दिवसाचा अनुभव घेण्यासाठी ठाणे, कल्याणमध्ये खगोलप्रेमींच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शनिवारी, दुपारी १२ ते १२.३० वाजताच्या दरम्यान ठाण्यातील घंटाळी मैदान आणि कल्याण येथील सुभाष मैदानात खगोलप्रेमींना हा योग अनुभवता येणार आहे.
शून्य सावली दिवस हा सर्वांच्या कुतुहलाचा विषय आहे. कायम सोबत असणारी सावली देखील शून्य सावलीच्या दिवशी काही वेळासाठी नाहिशी होती. ही सावली पाहण्यासाठी अनेक खगोलप्रेमी या दिवसाची वाट पाहत असतात. वर्षात दोनदा शून्य सावलीचा योग असतो. दरवर्षी हा योग पाहण्यासाठी खगोलप्रेमी उत्सुक असतात. यंदा शनिवार, १७ मे रोजी हा दिवस अनुभवता येणार आहे. शून्य सावली संकल्पना म्हणजे नक्की काय या बाबत नागरिकांना माहिती मिळावी ठाण्यातील मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग यांच्यावतीने ठाण्यातील नौपाडा येथील घंटाळी मैदानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दा.कृ.सोमण, प्रा ना द मांडगे हे खगोलअभ्यासक काही प्रात्यक्षिकांच्या आधारे शून्य सावली विषयी माहिती देणार आहे. तर, कल्याणमध्ये आकाश मित्रमंडळ आणि सुभेदार वाडा कट्टा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी खगोलअभ्यासक हेमंत मोने उपस्थितांना संकल्पना समजावून सांगणार आहेत. तरी सर्वांनी या शून्य सावलीचा अनुभव घेण्यासाठी मैदानात उपस्थित राहावे असे संस्थांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.चौकट
मकर वृत्त आणि कर्कवृत्त प्रदेशात दोन वेळा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. शून्य सावली योग ही वर्षातून दोनदा घडणारी भौगोलिक घटना आहे. स्थळांचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती समान झाली तर मध्यान्हकाळी सूर्य डोक्यावर असतो. त्यावेळी आपली सावली काही वेळासाठी दिसेनाशी होते, त्यालाच शून्य सावली दिवस म्हटले जाते.