ठाणे : शहापूर येथे मुलींच्या जेवणात तणनाशक टाकून त्यांची हत्या करणाऱ्या संध्या भेरे हिला न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संध्या भेरे असे महिलेचे नाव असून मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याचा बनाव तिने रचला होता. मुलींचा साभांळ करणे शक्य होत नसल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
काव्या (१०), दिव्या (८) व गार्गी (५) अशी मृत मुलींची नावेआहेत. शहापूर लगत असलेल्या चेरपोली येथे मुलींचे वडील संदीप भेरे हे राहत होते. तर त्यांची पत्नी संध्या ही तीन मुलींसह गेल्या आठ महिन्यांपासून तालुक्यातील आस्नोली येथे तिच्या माहेरी राहत होती. सोमवारी २१ जुलैला काव्या, दिव्या व गार्गी या तिघींना पोटदुखी व उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने मुलींच्या आईने त्यांना आस्नोली येथील खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. त्यानंतर त्यांना शहापुर उप जिल्हारुग्णालयात दाखल केले.
मात्र तिघींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यापैकी काव्या आणि दिव्या यांना मुंबई येथील नायर आणि गार्गी हिला घोटी येथील एसएमबीटी या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती किन्हवली पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक नायर रुग्णालयात जबाब घेण्यासाठी जात होते. परंतु गुरुवारी उपचारा दरम्यान काव्या हिचा मृत्यू झाला. तर दिव्याची प्रकृती चिंताजनक झाली होती. तर घोटी येथील रुग्णालयात दाखल असलेल्या गार्गीची प्रकृती देखील बिघडल्याने तिचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी सकाळी दिव्याचा देखील उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परंतु तिच्या वडिलांनी या प्रकाराबाबत संशय व्यक्त केला आहे. किन्हवली पोलिसांनी मुलींची आई संध्या हिला चौकशी साठी ताब्यात घेतले होते. यामध्ये जन्माला आलेल्या तीनही मुलीच, त्यांना सांभाळण्याचा कंटाळा व त्यांच्या खर्चाचा असह्य ताण यामुळे जीवन त्रस्त झाल्याने मुलींच्या जेवणात तणनाशक रसायन मिसळून त्यांना खायला घातल्याचे तपासात निष्पन्न झाले. तणनाशक खाल्ल्याने तिघींचा मृत्यू झाला. याप्रकरणात संध्या भेरे हिला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर संध्या हिला न्यायालयात हजर करण्यात आले. तिला ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.