शहापूर : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या शहापुर–सापगाव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी निधी नाही, असे कारण देणाऱ्या शासनाविरोधात शहापुर–सापगाव संघर्ष समिती आणि एकलव्य दिव्यांग फाउंडेशनच्या दिव्यांग सदस्यांनी गुरुवारी पावसात खड्डेमय रस्त्यावर ‘भीक मागो’ आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त केला. या आंदोलनात जमा झालेली रक्कम एमएसआरडीसीला दिला जाणार आहे.

शहापुर – सापगाव रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गेल्या आठ वर्षात उन्हाळ्यात रस्त्यावरील धूळ आणि पावसाळ्यात खड्यांचा चिखल सहन करीत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने आम्हाला भीक मागायला लाज वाटत नाही. रस्त्याची दुर्दशा आम्ही पाहू शकत नाही असे म्हणत दिव्यांगांनी गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास भीक मागो आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.

या रस्त्यांवरील खड्यांमुळे किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अनेक अपघात झाले असून यामध्ये अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला आहे.तसेच खड्यांमुळे बहुतांशी वाहनांचे नुकसान होत असून अनेक नादुरुस्त वाहनांमुळे वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून आंदोलने, उपोषण, रास्तारोको, खड्यात बसून आंदोलन अशी विविध प्रकारची आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, एमएसआरडीसी प्रशासनाने आश्वासन देऊन आंदोलनकर्त्यांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसून वेळ मारून नेल्याने तालुक्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाच्या या वेळकाढू धोरणाचा तीव्र निषेध व्यक्त करीत केलेल्या भीक मागो आंदोलनात सुमारे सहा हजाराची रक्कम जमा झाली असून ही रक्कम शहापुर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून एमएसआरडीसीला देण्यात येणार आहे.