ठाणे – ठाणे जिल्ह्यासाठी यंदाचा स्वातंत्र्यदिन अधिक अभिमानाचा ठरणार आहे. देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर उद्या १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन मुख्य सोहळ्यासाठी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भावसे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच नयना अशोक भुसारे यांची विशेष पाहुणे म्हणून निवड झाली आहे. केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागाकडून त्यांचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान केला जाणार आहे.
देशभरातील २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून निवडक २१० ग्रामपंचायत सरपंचांची या सन्मानासाठी निवड झाली असून, महाराष्ट्रातून १५जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या १५ जणांपैकी नऊ महिला सरपंच आहेत. ग्रामीण भागात प्रशासनिक कार्यात महिलांचा वाढता सहभाग आणि नेतृत्व कौशल्य याची ही मोठी नोंद आहे.
सन्मानासाठी निवड झालेल्या सर्व सरपंचांनी आपल्या गावांच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. पायाभूत सुविधा उभारणे, आरोग्य व शिक्षणाच्या सेवा सुधारणे, तसेच सर्वसमावेशक सामाजिक उपक्रम राबवणे अशा विविध क्षेत्रांत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. भावसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कार्यरत असलेल्या नयना भुसारे यांनी आपल्या कार्यकाळात गावात पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता व्यवस्था, महिलांसाठी स्वावलंबन उपक्रम आणि युवकांसाठी रोजगारनिर्मिती यांसारख्या अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे.
तसेच केंद्र सरकारच्या ‘हर घर जल’, ‘प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण’, ‘मिशन इंद्रधनुष’ यांसारख्या योजनांचे शंभर टक्के यशस्वी कार्यान्वयन करणे, तसेच स्थानिक गरजांनुसार नवीन उपक्रम राबवून गावांचा चेहरामोहरा बदलण्याचे काम भुसारे यांनी केले आहे.
राष्ट्रीय स्तरावरचा हा सन्मान ठाणे जिल्ह्यासाठी एक मोठी गौरवाची बाब आहे. एका लहानशा गावातील महिला सरपंच एवढ्या भव्य आणि ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होत असल्याने संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण आहे. ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनांकडून या यशाबद्दल नयना भुसारे यांचे अभिनंदन केले जात आहे.