शहापूर : गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणाचे सर्व ३८ दरवाजे तसेच भातसा धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे धरणाचे पाणी ओसंडून वाहत असून सततच्या पावसामुळे शहापूर तालुक्याला तडाखा बसला आहे. नद्या,नाले-ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. सावरोली येथील नदीपात्रातील पाणी पुलावरून वाहू लागल्याने वासिंद–वाडा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अतिवृष्टीमुळे तालुक्यात घरे, भिंती, दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या असून यामध्ये नागरिकांचे नुकसान झाले.
तालुक्यातील भातसा धरणाची पाण्याची पातळी वाढत असून धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे सापगाव पुलालगत पाणी पोहोचले. सावरशेत–साजिवली पुलावरून पाणी वाहू लागल्याने महसूल विभागाने सावधानतेचे फलक उभारले आहेत. विहिगाव पुलाजवळ पोलीस व सुरक्षा रक्षक तैनात करून पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
भातसानगर येथील राजेश विठ्ठल निचिते, बोरशेती येथील शंकर तुकाराम भागरे यांची घरे कोसळली. ढाढरे (फणसवाडी) येथील धाऊ हरी उघडा यांच्या घरावरील कौले उडाली, बेलवली येथील विनायक यशवंत भोईर यांच्या पोल्ट्रीची भिंत कोसळली. याशिवाय, विहिगाव (जव्हार फाटा) समोर दरड कोसळल्याने मुंबई–नाशिक महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू असून चिखल हटवण्याचे काम सुरू होते.
भातसई नदी तुडुंब भरून वाहू लागल्याने वासिंद परिसरातील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या होत्या. त्यामुळे काही शेतघरांमध्ये पाणी शिरले आहे. अल्याणी देवळी पाडा येथेही भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. शहापुरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना आदेश देत सापगाव, पिवळी–कांबरे, गेगाव–शेलवली, वाशाळा–टोकरखांड, तुते–सरलांबे येथील पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे निर्देश दिले. सुदैवाने या अतिवृष्टीत जीवितहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणावर घरांचे, पोल्ट्रीचे व शेतीचे नुकसान होऊन शेतकऱ्यांसह नागरिकांचे हाल होत आहेत.