बदलापूर : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा प्रवास करत कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी रविवारी भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले वडनेरे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्याशी वाद झाल्याने शिवसेनेतून बाहेर पडले होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी विधानसभेची तयारी केली. २०२४ विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणूज लढवली. भाजपचे आमदार किसन कथोरे यांचा यात विजय झाला होता. विशेष म्हणजे रविवारी आमदार किसन कथोरे यांच्याच उपस्थितीत वडनेरे यांनी भाजपात प्रवेश केला. वडनेरे पालिका निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
एक अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळख असलेले शैलेश वडनेरे यांनी २०१९ वर्षात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. त्यापूर्वी वडनेरे शिवसेनेचे नगरसेवक होते. सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांचा शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यासोबत वाद झाले होते. त्या वादातून वडनेरे यांच्या कार्यालयावर हल्लाही झाला होता. त्यावरून म्हात्रे बंधूंवर बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर वडनेरे आणि म्हात्रे यांच्यातील संघर्ष वाढतच राहिला होता. अखेर वडनेरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. विधानसभा निवडणुकीत अधिकृत पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नंतर वडनेरे यांनी राजकारणापासून अंतर ठेवले.
२०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी वडनेरे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष बनले होते. मात्र निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेल्या सुभाष पवार यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे वडनेरे नाराज झाले होते. त्यांनी पुढे बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. या काळात त्यांनी विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत प्रचार केला होता. विधानसभेनंतर ते पुन्हा शिवसेनेत प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र तसे झाले नाही.
रविवारी शैलेश वडनेरे यांनी ज्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली त्या आमदार किसन कथोरे यांच्याच हस्ते भाजपात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्या समर्थकांनीही प्रवेश घेतला. आगामी पालिका निवडणुकीत उतरण्याची तयारी यावेळी वडनेरे यांनी बोलून दाखवली. माझ्या पायगुणाने भाजपचाच नगराध्यक्ष बदलापुरात निवडून येईल, अशी भावनाही यावेळी वडनेरे यांनी व्यक्त केली. तसेच आमदार किसन कथोरे यांनीही वडनेरे यांचे भाजपात स्वागत केले. वडनेरे यांनी गेल्या पाच वर्षात दोन पक्ष बदलले आहेत. त्यामुळे आगामी पालिका भाजपला किती फायदा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. स्थानिक पातळीवर भाजपचे जुने पदाधिकारी यांच्यावर अन्याय होऊ नये अशी भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे. वडनेरे यांनी शहरातील सर्वात मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात गुंतवणूकदारांना मोठे सहकार्य केले आहे. त्यामुळे त्यांचा मोठा पाठिंबा वडनेरे यांना आहे.
प्रतिक्रिया : काल ठरले आणि आज हा प्रवेश झाला. वडनेरे यांना मी आधीपासून ओळखतो. वडनेरे कार्यकर्ते आहे. कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये या भावनेतून हा प्रवेश झाला आहे. – किसन कथोरे, आमदार, मुरबाड.