डोंबिवली : डोंबिवली ठाकुर्ली ९० फुटी रस्ता परिसरातील गृहसंकुलात राहणाऱ्या शार्दुल विचारे या तरूणाने पहिल्या टप्प्यातील सनदी लेखापाल (सी. ए. फाऊंडेशन) परीक्षेत ४०० पैकी ३५८ गुण मिळून देशात तिसरा क्रमांक मिळविण्याचा मान मिळवला आहे. शार्दुल डोंबिवली एमआयडीसीतील ओंकार इंटरनॅशनल शाळेचा आयसीआयसीआय परीक्षा मंडळाचा विद्यार्थी आहे.

इयत्ता बारावीची परीक्षा दिल्यानंतर शार्दुलने सी. ए. फाउंडेशनची परीक्षा दिली होती. इंडियन इन्सटिट्युट ऑफ चार्टड अकाउन्टट इन इंडिया संस्थेतर्फे ही परीक्षा घेण्यात आली होती. शार्दुलला इयत्ता दहावीमध्ये ९५ टक्के गुण, बारावीमध्ये ९९.०६ टक्के गुण मिळवून तो देशात तिसरा आला होता. माटुंगा येथील पोद्दार कनिष्ठ महाविद्यालयात असताना आपण सनदी लेखापालाची परीक्षा द्यायची असे त्याने ठरविले होते. त्याप्रमाणे अभ्यास सुरू केला होता. बारावीची परीक्षा आणि सी. ए. फाऊंडेशनचा अभ्यास एकाचवेळी तो करत होता.

मुलुंड येथे शिकवणी वर्ग सुरू होते. बारावीची परीक्षा झाल्यानंतर मेमध्ये सी. ए. फाऊंडेशनची परीक्षा दिली. या परीक्षेत आपणास यश मिळाले. या परीक्षेतील गणित विषयात आपणास १०० पैकी १०० गुण मिळाले. सनदी लेखापाल परीक्षचे अद्याप दोन टप्पे आहेत. ते आपणास पूर्ण करायचे आहेत. त्यादृष्टीने आपण तयारी केली आहे. सनदी लेखापाल होण्याची आपली तीव्र इच्छा आहे. ती पूर्ण करण्याचे नक्की केले आहे, असे शार्दुल सांगतो. सनदी लेखापाल झाल्यानंतर विदेशाचा विचार न करता देशात आपली पुढची व्यावसायिक वाटचाल सुरू ठेवणार आहे. आपणास वाचनाची आवड आहे. क्रिकेट पाहणे, खेळण्याची आवड आहे. अभ्यास करतानाच हे छंदे आपण जोपासतो. आई, वडील वित्तीय सल्लागार आहेत, असे शार्दुलने सांगितले.

जुळ्या बहिणींचे यश

कल्याण मधील लोकग्राममध्ये कुटुंबीयांसमवेत राहणाऱ्या ईशदा भालचंद्र दामले आणि ईशा भालचंद्र दामले या जुळ्या बहिणींनी सनदी लेखपाल परीक्षेच्या अंतीम पूर्व परीक्षेत यश मिळवले आहे. सनदी लेखापाल होण्याचे ध्येय या दोघींनी निश्चित केले होते. त्या दिशेने त्यांनी आपली शैक्षणिक वाटचाल केली. कल्याणमधील लोकग्राममध्ये दोघींनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. माटुंगा येथील पोद्दार महाविद्यालयात कनिष्ठ, उच्च महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. ईशाला बारावीत ९८.०७ टक्के गुण पडले होते. ती राज्यात पहिली आली होती. ईशादला ९३ टक्के गुण मिळाले होते. पदवीचा अभ्यास करताना दोघींनी सी. ए.चा अभ्यास केला. दोघी एकत्र अभ्यास करत होत्या. थोडे चढउतार आले. पण त्यात हार न मानता दोघींनी जिद्दीने सी. ए. परीक्षेचा अभ्यास केला. ईशा दुसऱ्या ग्रुपमधून यशस्वी झाली तर ईशदाने दोन्ही ग्रुप एकावेळी देऊन यश संपादन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दोघींचे वडील बँकर होते. ते गेल्या वर्षी सेवानिवृत्त झाले. मुलींच्या शिक्षणासाठी अणुउर्जा अभियंता असलेल्या आईने नोकरी सोडली. सनदी लेखापाल म्हणून पुढील जीवनात वाटचाल करणार आहोत, असे ईशा, ईशदाने सांगितले.