ठाणे : महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक सर्व सुविधा द्याव्यात, अशी सुचना करत कंत्राटी कर्मचा-यांना ठेकेदार पगार वेळेत देत नसेल तर त्याचा ठेका रद्द करुन त्याला काळ्या यादीत टाकावे, असे आदेश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी पालिका प्रशासनाला दिले. महापालिका सेवेत २५ वर्षं पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे मिळतील या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनास दिल्या.

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रूक्कानसिंग डागोर यांनी मंगळवारी महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव,अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह अधिकारी, सफाई कामगारांच्या युनियनचे पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत डागोर यांनी पालिका सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन, मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला. दरम्यान सफाई कर्मचारी हा सर्वात महत्वाचा घटक असून शहराचे सौंदर्य ठिकवून ठेवण्याचे काम ते सातत्याने करत असल्याने त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ प्राधान्याने देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या.

सफाई कर्मचाऱ्यांसाठी चेंजिंग रूम, वैद्यकीय सुविधा, पी एफ, नवीन भरती प्रक्रिया तसेच लाड-पागे धोरणानुसार वारसा हक्काची प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत. सफाई कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याची कार्यवाही ३० दिवसात करावी, तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार नोकरीत सामावून घ्यावे. त्याचप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांना रूग्णालयात कॅशलेस सुविधा उपलब्ध होतील, या दृष्टीने योजना तयार करावी. ठाणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना देखील आरोग्यविषयक सर्व सुविधा द्याव्यात, कंत्राटी कर्मचाऱ्यांना जर ठेकेदार पगार वेळेत देत नसेल तर त्या ठेकेदाराचा ठेका रद्द करुन त्याला काळ्या यादीत टाकावे तसेच महापालिका सेवेत २५ वर्षं पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे मिळतील या दृष्टीने कार्यवाही करावी, अशा सूचना शेरसिंग डागोर यांनी महापालिका प्रशासनास दिल्या.

ठाणे महापालिकेच्यावतीने सफाई कामगारांसाठी निवारा, एकूण कार्यरत सफाई कर्मचारी, तात्पुरते सफाई कर्मचारी, त्यांची पदोन्नती, वेतन, आरोग्यविषयक सुविधा तसेच महापालिकेच्या घनकचरा व मलनिःसारण विभागांतर्गत मनुष्यबळ, रिक्त जागा, पदोन्नती, कर्मचाऱ्यांचे भत्ते, वारसा हक्काने देण्यात येणाऱ्या नियुक्त्या याबाबत उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, यांनी बैठकीत सविस्तर माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांसाठी उत्कृष्ट सफाई कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे, मासिक वेतन वेळेवर अदा करणे, सफाई कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरचे फायदे हे सेवानिवृत्ती दिवशीच दिले जातात. सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य साधन दिली जातात, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाते तसेच महिला कर्मचाऱ्यांची मॅमोग्राफी तपासणी केली जाते, असे पालिका प्रशासनाने बैठकीत सांगितले. या सुविधांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी समाधान व्यक्त केले.