कल्याण – ऐरोली-काटई उन्नत रस्त्याचे मुंब्रा भागापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्याच्या मुंब्रा ते काटई प्रस्तावित मार्गाचे भूसंपादन करण्यासाठी एमएमआरडीएने प्रयत्न चालविले आहेत. परंतु, जोपर्यंत कल्याण शिळफाटा रस्ते बाधितांना त्यांचा मंजूर सुमारे २८७ कोटीचा मोबदला दिला जात नाही. ऐरोली-काटई रस्त्याच्या भूसंपादनाचे शेतकऱ्यांच्या विचाराशिवाय मूल्यांकन ठरत नाही. तोपर्यंत ऐरोली-काटई उन्नत मार्गाच्या काटई भागातील भूसंंपादनाला आमचा विरोध राहील, अशी आक्रमक भूमिका काटई गावच्या ग्रामस्थांनी घेतली आहे.
मुंबईतून बाहेर पडण्यासाठी, प्रवेशासाठी दहिसर, वाशी, न्हावाशेवा, मुलुंड तपासणी नाका असे मार्ग आहेत. या मार्गांवरील वाहनांचे वाढते प्रमाण विचारात घेऊन मुंंबईच्या प्रवेशद्वारावर वाहतुकीच्या विभाजनासाठी आणखी एक मार्ग असावा या विचारातून शासनाने दहा वर्षापूर्वी ऐरोली काटई उन्नत, भूस्तर १२ किमीचा मार्ग मंजूर केला. ऐरोली काटई मार्गिकेमुळे बदलापूर, कर्जत, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, मुंब्रा भागात येणारे प्रवासी या रस्त्याने प्रवास करू शकतात.
ऐरोली काटई मार्गाचे उन्नत, जमीन स्तरावरील मुंब्रा शहरापर्यंतचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. मुंब्रा बोगदा ते मौजे कौसा, शीळ, डावले, डोमखार, देसाई गावातून ऐरोली काटई रस्ता शिळफाटा रस्त्यावरील काटई नाका येथेपर्यंत उतरविण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात हा रस्ता ४५ मीटर रूंदीचा आहे.
या रस्त्याच्या मुंब्रा परिसरातील भूसंपादनाची जबाबदारी ठाणे पालिकेकडे आहे. काटई हद्दीतील भूसंपादनाची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे आहे. ठाणे पालिका, एमएमआरडीएने आपल्या हद्दीतील ऐरोली काटई रस्त्यासाठी भूसंपादन करून त्याचा मोबादला शासनाकडून मिळवून रस्ते बाधित शेतकऱ्यांना द्यायचा आहे, अशी माहिती सर्व पक्षीय युवा मोर्चाचे नेते काटई येथील गजानन पाटील यांनी दिली.
काटई गाव हद्दीतील ऐरोली काटई उन्नत मार्गाचे काम एमएमआरडीएला सुरू करायचे आहे. या गावातील जमीन ताब्यात नसल्याने प्राधिकरण, ठेकेदाराची कोंडी झाली आहे. जोपर्यंत शिळफाटा रस्त्याचा मोबदला आणि ऐरोली काटई उन्नत मार्गाचे जमिनीचे मूल्यांकनाचे धोरण एमएमआरडीए ठरवत नाही. तोपर्यंत आमचा या मार्गाला जमिनी देण्यास विरोध असेल, अशी भूमिका काटईतील सुमारे ७० हून अधिक शेतकऱ्यांनी घेतली आहे.
शेतकऱ्यांचा विरोध
काटई येथे एरोली काटई उन्नत मार्गाच्या मोजणी, भूसंंपादन कामासाठी भूमि अभिलेख, एमएमआरडीएचे अधिकारी काही दिवसापूर्वी आले होते. शेतकऱ्यांनी या जमिनीचे मूल्यांकन ठरवा, मगच मोजणी करून देऊ अशी आक्रमक भूमिका घेतल्याने अधिकाऱ्यांना परत जावे लागले होते.
ऐरोल काटई उन्नत मार्गासाठी काटईतील भूसंपादन करण्यापूर्वी शिळफाटा रस्ते बाधितांना पहिले मंजूर मोबदला देण्यात यावा. काटईतील जमिनीचे मूल्यांकनाचे धोरण शेतकऱ्यांना विचारात घेऊन करावे. मोबदला रोख द्यावा. त्यानंतरच शेतकरी ऐरोली काटई मार्गाच्या जमीन मोजणी आणि भूसंपादनाला परवानगी देतील.
गजानन पाटील, सर्व पक्षीय युवा मोर्चा, काटई. डोंबिवली.
