डोंबिवली -कल्याण शिळफाटा रस्त्याच्या रूंदीकरण, काँक्रिटीकरण न झालेल्या काटई ते मानपाडा चौक, काटई ते देसाई, खिडकाळी गाव दरम्यानच्या रस्ते सीमारेषा पट्ट्या रखडल्याने शिळफाटा रस्त्यावरील प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका बसत आहे. शिळफाटा रस्ते बाधित शेतकऱ्यांना शासनाने भरपाई दिली तर शेतकरी तात्काळ आपल्या जमिनीवरील हक्क सोडून रखडलेल्या रस्ते सीमारेषा पट्ट्यांची कामे करण्यास परवानगी देतील. हा महत्वपूर्ण विषय शासनाकडून दुर्लक्षित करण्यात येत असल्याने त्याचा फटका प्रवाशांना वाहतूक कोंडीच्या माध्यमातून बसत आहे.

शिळफाटा रस्त्यामध्ये आमच्या जमिनी आहेत त्याची भरपाई द्या आणि तात्काळ रखडलेली कामे पूर्ण करून घ्या. आम्हाला विकासात अडथळा आणण्याची अजिबात हौस नाही.पण, शासन आमची भरपाईची दोन वर्षापूर्वी मंजुर झालेली सुमारे ३०७ कोटीची रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहे. जेवढी जमीन रस्ते, पूल कामासाठी पाहिजे तेवढ्याच शेतकऱ्यांना भरपाई दिली जात आहे. ही दुजाभावाची शासनाची भूमिका शेतकऱ्यांचा रोष वाढवित आहे, असे शिळफाटा बाधित शेतकऱ्यांनी सांगितले.

शिळफाटा रस्त्यावरील काटई ते रुणवाल गार्डन वसाहत ते मानपाडा चौक, मानपाडा ते सोनारपाडा, काटई ते देसाई, खिडकाळी भागात रस्ते चार पदरी झाले आहेत. परंतु, या रस्त्यांच्या दोन्ही बाजुला असलेल्या सुमारे सात ते आठ फुटाच्या रस्ते सीमारेषा पट्या बाधित शेतकऱ्यांनी भरपाई मिळत नाही तोपर्यंत तेथे काम करून देणार नाही अशी भूमिका घेत अडवून ठेवल्या आहेत. त्यामुळे शिळफाटा रस्त्याच्या इतर भागातून सहा मार्गिकांकडून सुसाट वेगाने वाहने धावत असतात. परंतु, ही वाहने रस्ते सीमारेषा पट्ट्या रखडलेल्या भागातील चार मार्गिकांमध्ये आली की वाहतूक कोंडीला सुरूवात होते. यात अवजड वाहने असली की कोंडीत आणखी भर पडते.

चार मार्गिकांच्या ठिकाणी रस्ता रूंदीकरण, काँक्रिटीकरण न झालेल्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. या कोंडीच्या भागात रस्त्याच्या मध्यभागी मेट्रो मार्गाची कामे सुरू आहेत. या कामांमुळे रस्त्याच्या मधला सुमारे दहा फुटाचा भाग अडला गेला आहे. त्यामुळे वाहने अरूंद मार्गिकेतून धावतात. याशिवाय मानपाडा चौक ते खिडकाळी दरम्यान गावांतर्गत उंबार्ली गाव, विद्यानिकेतन शाळेकडून येणारी आणि जाणारी वाहने, बदलापूर, खोणीकडून सखारामशेठ विद्यालय जवळ लोढा संकुलाजवळ शिळफाटा रस्त्यावर येणारी आणि जाणारी वाहने, याशिवाय कोळेगावाकडे जाणारी, बदलापूरकडे धावणारी, निळजे गाव, पलावा संकुलातून बाहेर पडणारी वाहने अधिक संख्येने शिळफाटा रस्त्यावर येतात या कालावधीत ही वाहने मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला आडवी आली की त्या त्या भागात कोंडी होते.

याशिवाय रस्ते मार्गिकांच्या उलट दिशेने वाहने चालविण्याचे प्रमाण शिळफाटा रस्त्यावर वाढले आहे ही वाहनेही कोंडीला सर्वाधिक कारणीभूत आहेत, असे प्रवाशांनी सांगितले. या निर्ढावलेल्या प्रवाशांवर कारवाई करून वाहतूक पोलीसही थकले आहेत.