ठाणे : मुंबई येथील वरळी भागातील एनएससीआय डोम येथे शिवसेना (ठाकरे) आणि मनसेचा हिंदी सक्ती आदेश रद्दच्या निर्णयाचा विजयी मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीचे संकेत देत मराठी माणसाच्या एकजुटीचा नारा दिला. त्याला शिंदेंच्या युवा सेनेने व्यंगचित्रातुन प्रतिउत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे, मुंबई महापालिकेची तिजोरी आणि महापौर खुर्ची.. असे व्यंगचित्र असून त्याचे बॅनर लावत शिंदेंच्या युवा सेनेने उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.
मराठी भाषेवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापले आहे. हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आयोजित केलेला विजयी मेळावा शनिवारी वरळीत पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने सुमारे दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र आले होते. या मंचावरून भाषण करताना दोन्ही ठाकरे बंधूंनी सरकारवर टिका केली. तसेच या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीचे संकेत दिले. त्याचबरोबर त्यांनी मराठी माणसाच्या एकजुटीचा नारा दिला होता. त्याला त्याला शिंदेंच्या युवा सेनेने व्यंगचित्रातुन प्रतिउत्तर दिले आहे.
मुंबई महापालिकेची तिजोरी आणि महापौर खुर्ची यांचा व्यंगचित्रात समावेश आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचेही व्यंगचित्र असून त्यासोबत मराठी माणसाची एकजूट अशीच राहुद्या, असा मजकूर लिहून त्यांना टोला लगावण्यात आला आहे. या बॅनरच्या निमित्ताने ठाण्यात शिंदेच्या युवा सेनेने पुन्हा उद्धव ठाकरे यांना डिवचल्याचे दिसून येत आहे.