|| सागर नरेकर
स्वपक्षीयांसह मित्र पक्षातील विरोधाचे वारे थंड करण्यात किसन कथोरे यशस्वी:- राज्यात भाजपचे वारे वाहत असतानाही कुळगाव-बदलापूर नगरपालिका निवडणुकीत एकहाती विजय संपादन करणाऱ्या शिवसेनेने गेल्या काही वर्षांत मुरबाड विधानसभा क्षेत्रात मोठी ताकद उभी केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांची मोठी फौज शिवसेनेत दाखल झाल्याने ही ताकद आणखी वाढली. त्यामुळे युती झाली नाही तर या मतदारसंघातील विद्यमान आमदार किसन कथोरे यांना निवडणुक सोपी नाही असेच लोकसभा निवडणुकीपर्यंत वातावरण होते. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी कथोरे यांच्यासोबत जुळवून घेण्याची रणनीती आखल्याने या मतदारसंघातील राजकीय समिकरणच बदलून गेले आहे.
अंबरनाथ तालुक्यातील कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्र, अंबरनाथचा ग्रामीण भाग, सर्वात मोठी वांगणी ग्रामपंचायत, मुरबाड नगर पंचायत, मुरबाड तालुका आणि कल्याण तालुक्यातील काही भाग असा विस्तीर्ण पसरलेला मतदारसंघ म्हणून मुरबाड विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. शहरी, निमशहरी आणि ग्रामीण अशा तीन प्रकारच्या रचनेत असलेला हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच सर्वपक्षीयांना आव्हानात्मक ठरत आला आहे. असे असले तरी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात पटाईत असलेले किसन कथोरे यांनी सलग दोन वेळा या मतदारसंघातून विजय मिळविला आहे. शरद पवार यांच्या निकटवर्तीयांमध्ये ओळखल्या जाणाऱ्या कथोरे यांनी बदलत्या राजकीय हवेचा अंदाज घेत पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश मिळवला आणि विजय संपादन केला. तेव्हापासून या भागावर त्यांचे वर्चस्व कायम आहे.
गेल्या चार वर्षांत बदलापूर आणि मुरबाडमध्ये शिवसेना आणि भाजपात विळ्या-भोपळ्याचे नाते होते. मात्र मुत्सद्दी किसन कथोरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील नेत्यांना जवळ करण्यास सुरुवात केली. गेल्या दोन विधानसभा निवडणुकींत एकदा मनसेच्या तर एकदा शिवसेनेच्या तिकिटावर कथोरेंच्या विरोधात उतरलेल्या वामन म्हात्रे यांनाही गेल्या काही दिवसांत कथोरे यांनी आपल्या गटात ओढून घेतले आहे. त्यामुळे कथोरेंना होणारा विरोध जवळपास मावळल्याचे बोलले जाते. चार वेळा या मतदारसंघातून आमदार असलेले गोटीराम पवार सध्या सक्रिय राजकारणातून बाजूला पडले आहेत. त्यांचे पुत्र आणि ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे उरलीसुरली राष्ट्रवादीही थंड पडली आहे. सध्या सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव कथोरेंच्या विरोधात रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त होते आहे.
प्रमुख समस्या
बारवी धरणाची उंची वाढल्याने पर्यायाने बदलापूर शहराला उल्हास नदीतून अतिरिक्त ५० दशलक्ष घनलिटर पाणी मिळेल. मात्र त्यासाठीची वितरण व्यवस्था अद्याप उभी करता आलेली नाही. भोज धरणातून पाणी अजूनही मिळाले नाही. मुरबाड तालुक्यातील ५६ गावात यंदा टँकरने पाणीपुरवठा होत होता.
शहरासह ग्रामीण भागातील वीजेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. रोजगारासाठी ग्रामस्थांना अजूनही बदलापूर, कल्याण, कर्जतहून मुंबई गाठावी लागते.बदलापूर शहरातील नाटय़गृह कागदावरच आहे तर क्रीडा संकुलाच्या जागेवर मेट्रोच्या कारशेडचा घाट घातला जातो आहे.
गेल्या पाच वर्षांत वेगवेगळ्या प्रकारची कामे करण्याची संधी मला मतदारसंघात मिळाली. मात्र बदलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही याची खंत वाटते. – किसन कथोरे आमदार,
मतदार म्हणतात,
शहरातील रस्त्यांची आणि ग्रामीण भागातील रस्त्यांच्या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. मात्र यासोबतच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडेही लक्ष देण्याची गरज आहे. शहरातही शासकीय रुग्णालयांची स्थिती सुधारायला हवी. – आशीष गोळे, काका गोळे फाऊंडेशन, बदलापूर.
आज बदलापूर आणि आसपासच्या भागात मोठय़ा प्रमाणावर नाटय़रसिक, कलारसिक आहे. त्यांच्यासाठी शहरात किमान एखादे कलादालन होणे गरजेचे आहे. नाटय़गृह शहरात अजूनही होऊ शकलेले नाही. – सचिन जुवाटकर, चित्रकार, बदलापूर