ठाणे : आज महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजजीवनात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजासाठी दीर्घकाळ प्रलंबित असलेला आरक्षणाचा मुद्दा महायुती सरकारने अभ्यासपूर्ण निर्णयाने मार्गी लावला, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या निर्णयावर आता शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “कोण काहीही बोलो, पण जनतेला न्याय आणि विकासाचा मार्ग दाखवणारे खरे सरकार म्हणजे महायुती सरकारच”, असे त्यांनी म्हटले आहे.

खासदार म्हस्के म्हणाले की, ” आज महाराष्ट्राच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अभूतपूर्व निर्णय झाला. मराठा समाजातील युवकांना भेडसावणाऱ्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी आरक्षणाचा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिला. महायुती सरकारने सातत्याने प्रयत्न करत मराठा समाजाला न्याय देण्याचा ध्यास घेतला. उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी या प्रश्नाची दिशा ठरवून दिली होती. आज त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि लोकाभिमुख नेतृत्वाखाली, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सहकार्याने, मराठा समाजाच्या बहुतेक मागण्या मान्य करत सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

लढ्याला ठोस आधार मिळाला

या निर्णयामुळे मराठा बांधवांमध्ये समाधान आणि विश्वासाची नवी भावना निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मागण्यांवर शिक्कामोर्तब करत सरकारने समाजाच्या अपेक्षांना खरा न्याय दिला आहे. केवळ आरक्षणापुरते मर्यादित न राहता, मराठा समाजासाठी घेतलेल्या विविध उपाययोजना, रोजगाराच्या संधी आणि प्रशासकीय प्रक्रियेतील गती या गोष्टींनी या लढ्याला ठोस आधार मिळाला आहे, असे म्हस्के यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास प्रेरणादायी

यामध्ये सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे समाजाच्या हक्कांसाठी झालेला सातत्यपूर्ण संघर्ष. मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच्या मार्गाने चालवत ठेवलेला हा आंदोलनाचा प्रवास खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. त्यांच्या चिकाटी आणि धैर्यामुळे आज मराठा समाजाला ठोस विजय मिळवून देणारा हा टप्पा गाठता आला आहे, असेही म्हस्के यांनी म्हटले आहे.

कोण काहीही बोलो, पण..

महायुती सरकारने याआधीही मराठ्यांना न्याय मिळावा यासाठी अनेक पावले उचलली होती. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्यापासून ते शैक्षणिक आणि नोकरीच्या संधींमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळवून देण्यापर्यंत सातत्याने प्रयत्न केले गेले. आजच्या निर्णयाने या सर्व प्रयत्नांची परिपूर्ण परिणती झाली आहे. मी महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि सकल मराठा समाज बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. कोण काहीही बोलो, पण या राज्यातल्या जनतेला न्याय देणारे आणि विकासाचा मार्ग दाखवणारे खरे सरकार म्हणजे महायुती सरकारच, असेही म्हस्के यांनी म्हटले आहे.