राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेची अध्यक्षपदावर मोहोर; भाजपच्या माघारीमुळे निवडणूक बिनविरोध

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या दोन प्रमुख महापालिकांसह विविध शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्थांवर सातत्याने आपला वरचष्मा राखणाऱ्या शिवसेनेने ५५ वर्षांत प्रथमच ठाणे जिल्हा परिषदेवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आल्यानंतरही अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी एक सदस्य कमी असलेल्या शिवसेनेला ऐन निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत उभ्या ठाकलेल्या भाजपने निवडणूक अर्ज मागे घेतले. परिणामी जि. प. अध्यक्षपदी शिवसेनेच्या मंजूषा जाधव तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुभाष पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले.

ठाणे जिल्हा परिषदेची यंदाची निवडणूक शिवसेना आणि भाजप या राज्यातील सत्ताधारी पक्षांनी कमालीची प्रतिष्ठेची केली होती. ठाणे जिल्ह्यावरील निर्विवाद वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते. डिसेंबर महिन्यात झालेल्या जि. प. निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक २६ जागा जिंकून भाजपला धक्का दिला. मात्र, १५ जागांवर विजयी झालेल्या भाजपने राष्ट्रवादी (१० सदस्य), काँग्रेस (१) आणि भाजप पुरस्कृत (१) यांच्या साथीने सत्तेसाठीचे २७चे संख्याबळ गाठण्याची तयारी केली होती. शिवसेनेला अध्यक्षपदासाठी एका जागेची गरज होती. अशा वेळी तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बाजूला खेचण्यासाठी दोन्ही पक्षांनी प्रयत्न चालवले होते. ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील नियोजन भवनमध्ये सोमवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी शिवसेनेतर्फे मंजूषा जाधव आणि उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीतर्फे सुभाष पवार यांनी अर्ज दाखल केला होता. तर भाजपतर्फे अध्यक्ष पदासाठी नंदा उघडा आणि उपाध्यक्ष पदासाठी अशोक घरत यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीने हातमिळवणी केल्याने त्यांचे संख्याबळ ३६ इतके झाले. परिणामी भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

ठाणे जिल्हा परिषदेची स्थापना १९६२ साली झाली. तेव्हापासून कॉँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीची याठिकाणी सत्ता होती. जिल्हा विभाजनानंतर म्हणजेच ऑगस्ट २०१४ मध्ये ठाणे जिल्हा परिषद बरखास्त झाली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट होती. तब्बल साडे तीन वर्षांनंतर ही निवडणूक झाली असून याठिकाणी तब्बल ५५ वर्षांनंतर सत्तांतर होऊन शिवसेनेच्या हातीच पहिल्यांदाच सत्ता आली आहे.

नव्या युतीची चर्चा

या निवडणुकीच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यतील शिवसेना-राष्ट्रवादी युतीच्या नव्या समीकरणांची नांदी असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता, विकासाच्या मुद्दय़ावर ही निवडणूक लढविण्यात आली होती. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena wins thane zilla parishad president poll
First published on: 16-01-2018 at 02:57 IST