ठाणे : घोडबंदर रस्त्यावरील सेवा रस्ते खोदून ठेवले आहेत. त्याची कामे शिल्लक आहेत, असे सांगत यंदा घोडबंदर पाण्याखाली जाणार असल्याची भीती उबाठाचे माजी खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केली आहे. पाणी तुंबले तर संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

माजी खासदार राजन विचारे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची बुधवारी भेट घेतली. या बैठकीत ठाणे शहरातील तलावांची झालेली दुरावस्थेसह शहरातील अपूर्ण असलेल्या कामांबाबत विचारे यांनी विचारणा केली. घोडबंदर पट्ट्यात अनेक ठिकाणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत रस्त्यांची कामे सुरू असून त्याची मुदत ३१ मे पर्यंत पुर्ण होतील असे आयुक्तांनी सांगितले. मुदत संपण्यासाठी काही दिवस बाकी असले तरी कामे अजुन अर्धवट दिसत आहेत. त्यातच अर्धे ठाणे खोदून ठेवले असून घोडबंदर पट्ट्यात अपूर्ण असलेल्या कामांमुळे यंदाच्या पावसाळ्यात ठाणे तुंबले तर याला प्रशासन जबाबदार असेल, असे विचारे यांनी सांगितले. पावसाला तोंडावर आला असताना शहरातील नालेसफाई ४५ टक्के झाल्याचा दावा प्रशासनाने केला. उर्वरित ५५ टक्के नालेसफाई कधी पूर्ण करणार असा प्रश्न विचारे यांनी उपस्थित केला.

प्रशासनावर कोणाचे अंकुश

एखादा लोकप्रतिनिधी वारंवार पत्र देऊन जर त्या पत्रांची कोणाच्या सांगण्यावरून दाखल घेत नसतील तर सर्व सामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न विचारे यांनी उपस्थित केला. सध्या महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासन कारभार संभाळत आहे. आपल्याला वाटेल तसे काम अधिकारी करत आहेत. तसेच सत्तेत असणाऱ्या शिंदे गटाच्या मनमानी कारभारामुळे प्रशासनावर कोणाचे अंकुश राहिले नाही, अशी टिकाही विचारे यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा

गेल्या सहा महिन्यापासून ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर तलावाची झालेल्या दुरवस्थेबाबत वारंवार पत्र देऊन गाळ काढण्याची मागणी करत आहे. याचा नियोजित आराखडा ही मंजूर करून निधी अभावी काम थांबवून याकडे गांभीर्याने दुर्लक्ष करून आवडत्या ठेकेदारांची देयके काढण्यात अधिकारी व्यस्त आहेत. या त्यांच्या निष्काळजीपणामुळे तलावातील वारंवार मासे मरत आहे. सिद्धेश्वर तलाव , ब्रम्हाळा तलाव, मदार्डे तलावात मासे मरायला अधिकारी जबाबदार आहेत. पावसाळा लक्षात घेऊन गाळ न काढल्याने जर या तलावातील पाणी शेजारील झोपडपट्ट्यांच्या घरात घुसले तर संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी विचारे यांनी पत्राद्वारे केली.