बदलापूर : वनविभागाचे कर्मचारी कलिंगड कापल्यानंतरचा कचरा टाकू देत नाही म्हणून त्यांच्यावर पैसे घेण्याचा आरोप करत चित्रफीत बनवून व्हायरल करण्याच्या नादात बदलापुरात नवजात बालकांची खरेदी विक्री व्यवहाराचे बिंग फुटले आहे. याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी एका २४ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकाराने बदलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. समाजमाध्यमावर व्हाट्सअपच्या माध्यमातून खरेदी विक्रीची चर्चा केली जात होती असे दिसून आले आहे.

अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात वनविभागाचे कार्यालय आहे. येथे वनक्षेत्र ही आहे. याच वनक्षेत्रात कलिंगड विक्रेता कचरा टाकत होता. त्याला रोखणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची चित्रफीत प्रसारीत झाल्यानंतर कलिंगड विक्रेत्याने कर्मचाऱ्यांवर आरोप केले होते. त्यामुळे चित्रफितीची शहानिशा करण्यासाठी वन अधिकारी वैभव वाळिंबे यांनी संबंधित विक्रेत्याला कार्यालयात बोलावले होते. त्यावेळी संबंधित चित्रफीत किती जणांना प्रसारीत केली याची माहिती घेण्यासाठी वाळिंबे यांनी संबंधित विक्रेत्याचा मोबाईल तपासला.

त्यावेळी त्याच्या मोबाईलमध्ये व्हाट्सअपमध्ये काही संशयास्पद संवाद वाचायला मिळाले. यामध्ये लहान नवजात बालकांचे काही छायाचित्र आणि त्यावर काही किंमती लिहिण्यात आल्या होत्या. याचा संशय आल्याने वाळिंबे यांनी अधिक तपास केला. व्हाट्सअपवरील संवाद तपासत असताना लहान मुलांचे फोटो आणि त्यावर किमती तसेच किमतींवरून केली जाणारी चर्चावाचायला मिळाली. हे सर्व संशयास्पद वाटल्याने आम्ही तात्काळ याबाबत बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना तक्रार दिली, अशी माहिती वाळिंबे यांनी दिली आहे.

या प्रकारानंतर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांनी अधिक तपास करत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी बदलापूर पश्चिम येथील वालीवली येथे राहणाऱ्या तुषार साळवे (२४) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती थोरवे यांनी दिली आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये बालकांच्या खरेदी विक्रीचे संशयास्पद संदेश सापडले आहेत. प्रत्यक्ष खरेदी विक्री पकडली गेली नसली तरी यावरून तपास सुरू आहे, अशी माहिती थोरवे यांनी दिली आहे. या प्रकारानंतर बदलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याच गुन्ह्यातून सुटून आरोपी बाहेर

धक्कादायक म्हणजे या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी तुषार साळवे हा अशाच नवजात बालकांच्या खरेदी विक्रीच्या गुन्ह्यात नुकताच जामीनावर सुटून आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे हे बालकांच्या खरेदी विक्रीचे आंतरराज्य रॅकेट तर नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. यात अवैध पद्धतीने मुलांची खरेदी करणारे, विक्री करणारे आणि बालके उपलब्ध करून देणारे असे सर्वच गोत्यात येण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलांसाठी पाच ते सात लाखांचा दर ?

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपीचे व्हाट्सअप संदेश तपासल्यानंतर त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीने स्वतः अनाथालय चालवत असल्याचे भासवत अनेकांशी संवाद साधला आहे, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिसून आली. यात नवजात बालकांचे छायाचित्र आणि त्यावर दर लिहिला जात होता. पाच लाखांपासून सात लाखांपर्यंत दर बालकांच्या विक्रीसाठी मागणी केली जात होती. त्या किमतीवर चर्चाही केली जात होती. यातील काही मोबाईल क्रमांक ठाणे जिल्ह्यातील तसेच कल्याण आणि आसपासच्या भागातील असल्याची ही माहिती वनविभागातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात हा नवजात बालकांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार चालतो की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.