दुकानदारांना दिलासा

ठाण्यातील दुकानांसाठी रात्री ९.३०पर्यंतची वेळ

ठाण्यातील दुकानांसाठी रात्री ९.३०पर्यंतची वेळ

ठाणे : महापालिका क्षेत्रातील हॉटेल, फुड कोर्ट, उपाहारगृहे आणि मद्यालये यांना रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली असतानाच आता शहरातील दुकाने, बाजारपेठा आणि भाजीमंडई यांना सकाळी ७ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याचा निर्णय मंगळवारी प्रशासनाने घेतला. उपाहारगृहे, मद्यालये यांना अधिकची वेळ दिल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. या मुद्दय़ावरून टीका होऊ लागल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दसरा आणि दिवाळी सणाच्या तोंडावर व्यापाऱ्यांसह ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील दुकाने, बाजारपेठा, भाजी मंडई, हॉटेल, फुड कोर्ट, उपाहारगृहे आणि मद्यालये या आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. मात्र, हॉटेल, फुड कोर्ट, उपाहारगृहे आणि मद्यालये या आस्थापनांच्या मालकांनी केलेल्या मागणीनंतर त्यांना सकाळी ७ ते रात्री ११.३० या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी चार दिवसांपूर्वी घेतला. परंतु दुकाने, बाजारपेठा, भाजी मंडई सुरू ठेवण्याच्या वेळेत कोणताही बदल केला नव्हता. यामुळे महापालिका प्रशासनासह सत्ताधारी शिवसेनेवर टीका होऊ लागली होती. तसेच व्यापाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत होता. तसेच मद्यालये, हॉटेल तुपाशी आणि व्यापारी, दुकानदार उपाशी अशी टीका भाजपचे ठाणे शहरातील आमदार संजय केळकर यांनी केली होती.

नोकरदार वर्ग सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर खरेदीसाठी बाहेर पडतो. परंतु त्यावेळेत दुकाने बंद होत असल्यामुळे त्यांना खरेदी करणे शक्य होत नाही. तसेच व्यापाऱ्यांचेही आर्थिक नुकसान व्हायचे. त्यामुळे आस्थापनांची वेळ रात्री ९.३० वाजेपर्यंत करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली.

या संदर्भात ठाणे व्यापार उद्योग महासंघाचे अध्यक्ष देवीलाल जैन आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांना निवेदन दिले होते. त्यात शहरातील सर्व दुकाने रात्री ९.३० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर महापौर म्हस्के यांनी पालकमंत्री शिंदे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून सर्व दुकाने रात्री ९.३० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

..तर दुकानदारांवर कारवाई

दुकानदारांनी सर्व नियमांचे पालन करावे आणि जे नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शहरातील दुकाने, बाजारपेठा आणि भाजीमंडई या आस्थापना सकाळी ७ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे मंगळवारी जाहीर केले. त्यासंबंधीचा आदेशही त्यांनी काढला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shops in thane open till 9 30 pm zws