श्री गणेशमंदिर संस्थान, डोंबिवली
गुढीपाडवा आणि नववर्ष स्वागत यात्रा हे आता जणू काही समीकरणच बनले आहे. दशकभरापूर्वी डोंबिवलीत गणेश मंदिर संस्थान या संस्थेच्या पुढाकाराने या स्वागत यात्रा परंपरेची मुहूर्तमेढ रोवली गेली. आता महानगराचे स्वरूप प्राप्त झालेल्या डोंबिवलीतील गावपण जपण्याचे, सर्व डोंबिवलीकरांना एका समान धाग्याने एकत्र ठेवण्याचे काम ही संस्था करीत आहे. धार्मिक प्रेरणांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या या संस्थेच्या उपक्रमांचा हा थोडक्यात परिचय..

आता महानगर झालेले डोंबिवली हे पूर्वी छोटेसे खेडे होते. ‘गाव तिथे गणपती’ असे म्हटले जात असले तरी डोंबिवली त्याला अपवाद होते. १९२२ मध्ये डोंबिवलीकर ग्रामस्थांच्या लक्षात ही उणीव आली. शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी, मंगल कार्याची पहिली पत्रिका ठेवण्यासाठी गावात गणपतीचे मंदिर असावे, असे त्यांना वाटू लागले. गावातील कर्त्यां आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि २२ मे १९२४ रोजी गणपती मंदिराची स्थापना झाली. अगदी सुरुवातीपासूनच हे मंदिर सर्व जातीजमातींसाठी खुले करण्यात आले. पौरोहित्य करणाऱ्या महिला हा आता कौतुकाचा विषय असला तरी १९३० मध्ये मंदिराचे पौराहित्य करण्याचा प्रथम मान अंबुताई गोडबोले यांना मिळाला. १९४२ मध्ये गावाच्या गरजेतून येथे दशक्रिया विधी सुरू झाले. ते आजतागायत सुरू आहेत. १९२८ मध्ये संस्थानच्या वतीने गणेशोत्सव व १९५२ मध्ये महालक्ष्मी उत्सव  ग्रामस्थांनी सुरू केले. त्या परंपरा नवी पिढी अजूनही पाळत आहे. २७ ऑक्टोबर १९५२ रोजी मंदिराची वास्तू तयार झाली.  
१९९८ मध्ये मंदिराला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तत्कालीन विश्वस्त व अन्य नागरिकांनी डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रा सुरू केली. धर्म, पंथ, संप्रदाय यांच्या सीमारेषा पुसून मोठय़ा प्रमाणावर ग्रामस्थ यात सामील झाले. पारंपरिकतेचे विलोभनीय दर्शन, स्वयंशिस्त, सामाजिकतेचे भान याचे साक्षात दर्शन यात घडले आणि नववर्ष स्वागतयात्रेची मुहूर्तमेढ रोवली गेली. आपली संस्कृती लोकांपर्यंत जावी, तरुणांनी त्यात सहभागी व्हावे. चैत्र प्रतिपदेचा उत्सव साजरा करून नववर्षांची सुरुवात करावी हा या यात्रेमागचा उद्देश होता. गेली १६ वर्षे संस्थानच्या स्वागतयात्रा संयोजन समितीच्या वतीने स्वागतयात्रेचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात येत आहे. शहरातील अनेक संस्था या यात्रेत सहभागी होत आहेत. या यात्रेत कल्याण ग्रामीण, राजाजी पथ, एमआयडीसी, नांदिवली गाव अशा चार ठिकाणच्या उपयात्रा त्या त्या भागातून निघून चार रस्ता येथे स्वागतयात्रेत सामील होतात. यामुळे या यात्रेला एक विशाल स्वरूप प्राप्त झाले. यात्रा केवळ धार्मिक, पारंपरिक न राहता ती समाजासाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरावी म्हणून तिला सामाजिक चळवळीचे स्वरूप दिले गेले. स्वागतयात्रा पहिल्यापासूनच लहानथोरापांसून आप्तेष्टांपर्यंत सर्वाच्याच औत्सुक्याचा विषय ठरली आहे. चाकरमान्यांची डोंबिवली म्हणून शहराची ओळख आहे. कामाच्या गडबडीत एकमेकांना भेटायला वेळ नसला तरी दिवाळी पहाट आणि नववर्ष स्वागतयात्रेला वेळात वेळ काढून फडके रोडवर एकमेकांना भेटण्यासाठी सर्वजण एकत्र येतात. स्वागतयात्रा आणि फडके रोड हे समीकरणही तेव्हाच जुळले गेले..दिवाळी पहाट आणि नववर्ष स्वागतयात्रेला मोठय़ा प्रमाणात तरुणाई फडके रोडवर जमते. फडके रोड हा अनेकांच्या जीवनातील टर्निग पॉईंट ठरला आहे, अनेकांची मने इथे जुळली आणि संसारही बहरले. रोझ डे, व्हॅलेंटाईन डे, फ्रेण्डशिप डे यांसोबतच तरुणाई हिंदू नववर्ष स्वागतयात्रेतही तेवढय़ात उत्साहात सहभागी होत आली आहे. पारंपरिक वेशभूषेत, ढोल ताशांच्या तालावर थिरकत नववर्षांचे स्वागत केले जाते.
सामाजिकतेचे भान
नववर्ष स्वागत यात्रेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यात वसतिगृहांसाठी मूठभर धान्य देणे, आदिवासींना धान्यदान, पर्यावरण संवर्धन, स्वच्छ शहर आदींचा त्यात समावेश आहे. दुष्काळ निवारण निधीतून सातारा जिल्ह्यातील काही गावात जलाशय तसेच पाणी अडविण्यासाठी बंधारे, तलाव बांधण्यात आले. जलकुंभ बसविण्यात आले. नेत्रदान जनजागृती व नोंदणी अभियान राबविण्यात आले. यंदा कै. बाबा आमटे यांच्या अथक परिश्रमातून साकारलेल्या आनंदवन येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी निधी संकलित करण्यात येणार आहे. खेडय़ापाडय़ांमध्ये दुर्गम भागात
राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास सुकर व्हावा म्हणून त्यांना सायकली देण्याचा उपक्रमही संस्थानच्या वतीने राबविण्यात येणार आहे.

संस्थानतर्फे राबविण्यात येणारे उपक्रम
गणेश मंदिर संस्थान ही केवळ धार्मिक संस्था नाही. विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून शहरातील नागरिकांना निरनिराळया सोयी-सुविधा या संस्थेने उपलब्ध करून दिल्या आहेत. संस्थानचे सुसज्ज असे धार्मिक संदर्भ ग्रंथालय आहे. घरी पुरेसा एकांत अथवा जागा नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी संस्थानने अभ्यासिका उपलब्ध करून दिली आहे. डोंबिवलीकरांचे संगीतप्रेम लक्षात घेऊन संस्थानतर्फे नियमितपणे संगीत महोत्सव भरविला जातो. रविवारीय संगीत सभा आयोजित केली जाते. आरोग्य क्षेत्रातही गणेश मंदिर कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गरजू रुग्णांना अल्पदरात सोनोग्राफी सेवा, वैद्यकीय मदत दिली जाते. गरजू-गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत केली जाते. निर्माल्यापासून गांडूळ खत निर्मिती प्रकल्प राबवून संस्थानने पर्यावरणाचेही भान राखले आहे. बालसंस्कार केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी गणेशवाटिका व विरंगुळा कट्टा असे उपक्रम राबविले जातात. व्यक्तिमत्त्व विकास, बालसंस्कार शिबिरे, पर्यावरणाविषयी जनजागृती तसेच व्यसनमुक्ती केंद्रही संस्थानच्या वतीने चालविले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ढोल, झांज आणि ध्वजपथक  
केवळ स्वागतयात्रा व दिवाळी पहाटेला तरुणाईने एकत्र येऊ नये तर त्यांच्यातही सामाजिक बांधीलकी जपली जावी, एकोपा रहावा यासाठी संस्थानच्या वतीने ढोल ताशा, झांज व ध्वज पथकाची स्थापना करण्यात आली. सध्या जवळपास ३०० तरुण या पथकात सहभागी आहेत. डीजेच्या जमान्यात तरुणांनी पुन्हा एकदा ढोल ताशाला पसंती देत आपली संस्कृती जपली आहे. या निमित्ताने वर्षभर ही मुले एकमेकांशी बांधलेली असतात. यानिमित्ताने शहरातील उच्चशिक्षीत तरुण संघटित झाले आहेत. ते  आपापले गट करून स्वतंत्रपणे शहरात विविध उपक्रम राबवितात. थोडक्यात, लोकमान्य टिळकांना सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून अपेक्षित असलेले जनसंघटन करण्यात संस्थान यशस्वी झाले आहे.
शर्मिला वाळुंज