उल्हासनगरः ‘दोस्ती का गठबंधन’ म्हणत लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात उल्हासनगरातील कलानी कुटुंबीय आणि त्यांच्या गटाने शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्यासाठी कलानींनी जोमाने प्रचारही केला. आता पालिका निवडणुकांच्या तोंडावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ओमी कलानी यांची जवळीक चर्चेचा विषय बनली आहे.

रविवारी काही कार्यक्रमानिमित्त उल्हासनगरात आलेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ओमी कलानी यांच्या वाहनातून प्रवास केला. हा प्रवास सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. कलानींच्या सारथ्यात शिंदेंचा प्रवास पालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलवणारा ठरणार असल्याचे बोलले जाते.

एके काळी उल्हासनगर शहरात सुरेश उर्फ पप्पू कलानी यांचा करिष्मा चालत होता. त्यानंतर शिवसेना भाजप युतीने येथे कलानी यांना बाजूला सारले. आठ वर्षांपूर्वी विधानसभेतील यशानंतर भाजपने आपली ताकद स्वतंत्रपणे आजमावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी कलानी करिष्मा वापरला. ओमी कलानी यांना आपल्याकडे वळते करत भाजपने पालिकेवर एकहाती सत्ता मिळवली. मात्र अडीच वर्षात अनेक मतभेदांनंतर कलानींनी भाजपला जय महाराष्ट्र करत पुन्हा बंडखोरी केली आणि शिवसेनेचा महापौर पुन्हा उल्हासनगर महापालिकेवर बसला. तेव्हापासून कलानी आणि शिवसेनेची जवळीक वाढलेली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना ओमी कलानी यांनी पाठिंबा दिला. त्याला ‘दोस्ती का गठबंधन’ असे नाव दिले. त्यावेळी टीम ओमी कलानी हे फक्त श्रीकांत शिंदे यांना समर्थन देत होते. मात्र त्यांचा महायुतीला पाठिंबा नव्हता. त्याचा खासदार श्रीकांत शिंदे यांना फायदा झाल्याचे बोलले जाते.

लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभेत भाजम आमदार कुमार आयलानी यांना शिवसेनेने पाठिंबा दिला खरा. मात्र आता उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कलानी यांची पुन्हा शिवसेना आणि विशेषतः खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी जवळीक वाढल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील विविध समस्या घेऊन टीम ओमी कलानीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. तर रविवारी चालिया उत्सव, गणेश मंडळांतील मूर्तीचा मुखदर्श सोहळा अशा कार्यक्रमांसाठी खासदार श्रीकांत शिंदे उल्हासनगरात आले होते. यावेळी ओमी कलानी आणि त्यांचे पदाधिकारीही उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी खासदार शिंदे यांनी ओमी कलानी चालवत असलेल्या वाहनातून प्रवास केला.

ओमी कलानी सारथ्य करत असलेल्या वाहनातून केलेल्या प्रवासाची सध्या शहरात चर्चा रंगली आहे. ही मैत्री आगामी पालिका निवडणुकीत नव्या राजकीय समीकरणांची मांडणी तर करत नसावी, असे दबक्या आवाजात बोलले जाते आहे.

भाजप विरूद्ध कलानी संघर्षशहरात एकीकडे कलानी गटाने भाजप आमदार कुमार आयलानी यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. शहरातील विविध समस्यांवरून ओमी कलानी आणि त्यांचे सहकारी आयलानी यांच्यावर टीकेची झोड उठवत असतात. तर टीम कलानी भाजपवरही तुटून पडतात. त्यात कलानी मात्र शिंदेंच्या शिवसेनेच्या जवळ असल्याने पालिकेत नेमक्या कोणत्या युत्या आघाड्या होतात यावर चर्चा रंगू लागल्या आहेत.