लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: महापालिका शाळांमधील सहावी ते दहावी च्या वर्गातील विद्यार्थांची क्षमता वाढवून त्यांना अधिक स्पर्धात्मक वातावरण मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञानांचा वापर करण्यात येणार आहे. खासगी शाळांप्रमाणेच महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा गणवेश करण्याबरोबरच पहिल्या टप्प्यात २ सीबीएसई शाळा सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे महापालिका शाळांचे रूप बदलण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिका शाळांमधील गुणवत्ता वाढ, तंत्रज्ञानाचा वापर, गणवेशाचा नवीन रंग, त्याची उपलब्धता आणि शालेय क्रमिक पुस्तकांची उपलब्धता या विषयांचा आढावा आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी बैठकीत घेतला. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उपायुक्त अनघा कदम, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी दिलीप सुर्यवंशी उपस्थित होते.

हेही वाचा… अजित पवार आपल्या कर्तृत्वावर प्रसिद्ध झाले, बाप आणि पक्ष चोरून नाही; आनंद परांजपे यांचा श्रीकांत शिंदेंवर पलटवार

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच १५ जूनच्या आधी क्रमिक पुस्तके मिळायला हवीत, असे निर्देश त्यांनी शालेय विभागाला यावेळी दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून क्रमिक पुस्तके विनामूल्य दिली जातात. तर, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना महापालिका क्रमिक पुस्तके विनामूल्य देते. या संदर्भात, बालभारतीकडील पुस्तकांची उपलब्धता आणि खरेदी या दोन्ही गोष्टी ५ जूनपर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे.

हेही वाचा… ठाण्यात जलमापके बसविण्याचे काम होणार सहा महिन्यांत पूर्ण; जलमापके बसविण्याचे काम २० टक्के शिल्लक

शाळा सुरू झाल्यावर पुस्तके देणे हे महापालिकेचे अपयश असून त्याचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसतो. याची जाणीव ठेवून शिक्षण विभागाने जलद पावले उचलवीत, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, शालेय साहित्याच्या खरेदीसाठी असलेले दर निश्चित करून ते २० मेपर्यंत शाळांमार्फत पालकांना कळवावेत. म्हणजे पालकांना १५ जूनच्या आधी त्यांची खरेदी करणे शक्य होईल. तसेच, शाळा सुरू झाल्यावर त्यांची देयकेही शाळांकडे तत्काळ सादर केली जातील. विद्यार्थ्यांकडून देयके आल्यावर ते पैसे लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा होतील याची दक्षता विभागाने घ्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

नवीन गणवेश

ठाणे महापालिका शाळांमधील गणवेशाचा रंग बदलण्यात येणार आहे. सध्या गणवेश निवडीचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया जलद पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त बांगर यांनी दिले. तसेच, गणवेश आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास यांचे जवळचे नाते आहे. त्यामुळे टिकावूपणा सोबत त्याचा रंग आकर्षक आणि खाजगी शाळांच्या गणवेशांप्रमाणे उठून दिसणारा असावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

इंग्रजी माध्यम आणि सीबीएसई शाळा

महापालिकेच्या अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे सीबीएसई शाळा सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. पहिल्या टप्प्यात २ शाळा सुरू केल्या जाणार आहेत. त्यातील एक शाळा स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून तर दुसरी महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. या शाळांसाठी असलेल्या अटींची पूर्तता करणे सुरू आहे. त्याचा आढावाही आयुक्त बांगर यांनी बैठकीत घेतला. तसेच, पहिल्या टप्प्यात इंग्रजी माध्यमांच्या आणखी किमान १० शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी शिक्षक उपलब्ध करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या दोन्ही प्रकारच्या शाळांबाबत या वर्षी तयारी पूर्ण करून पुढील शैक्षणिक वर्षाची (२०२४-२०२५) प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे उद्दिष्ट निर्धारीत करण्यात आले आहे. त्याचा कालबध्द कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना बांगर यांनी दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्षमता वृद्धीसाठी तंत्रज्ञान

इयत्ता सहावी ते दहावी मधील विद्यार्थांची क्षमता वाढवून त्यांना अधिक स्पर्धात्मक वातावरण मिळवून देण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. त्यासाठी तंत्रज्ञानांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. या संबंधीचे एक सादरीकरण या बैठकीत करण्यात आले. तसेच केंद्रिय विद्यालय, एकलव्य शाळांमध्ये सुरू करण्यात आलेल्या या पद्धतीची माहिती यावेळी देण्यात आली. शाळेत उपलब्ध असलेल्या संगणक कक्षांचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिक सक्षम, अभ्यासू बनण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या शिक्षण आणि मूल्यमापन पद्धतीचे विवेचन या सादरीकरणात होते.