ठाणे : वारसा हक्काने ठाणे महापालिकेच्या सेवेत लागलेल्या २५ कर्मचाऱ्यांना नुकतीच कायम नियुक्ती देण्यात आली. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत वारसा हक्काच्या एकूण ३०० जणांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्यात आले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नियुक्ती पत्रे मिळाल्याने महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनात आस्थापना विभागाने विशेष मोहीम राबवून ही नियुक्ती प्रक्रिया पूर्ण केली आहे.

लाड-पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने जे सफाई कर्मचारी सेवानिवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्त होतात त्यांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत नियुक्ती देण्यात येते. नियुक्ती देण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची तीन वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर त्यांना महापालिकेच्या सेवेत कायम केले जाते.

आस्थापना विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम घेऊन कागदपत्रांची पूर्तता करून घेतली. या वारसांपैकी महापालिकेच्या सेवेत वर्ग तीनचे एक व वर्ग चारचे २४ अशा एकूण २५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती पत्रे देण्यात आली. यापैकी काही पत्रे प्रातिनिधिक स्वरूपात नुकतीच महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते देण्यात आली.