पश्चिमेतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून तापमान चाळीशीच्या आत राहत असल्याने ठाणे जिल्ह्याला मिळालेला दिलासा गुरुवारीही कायम होता. गेल्या आठवड्यात पाऱ्याने ४२ अंश सेल्सियस तापमानाचा पल्ला ओलांडला होता. गुरुवारी मात्र बुधवारच्या तुलनेत तापमानात किंचित घट पहायला मिळाली. जिल्ह्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद पलावा येथे झाली. पलावा येथे ४० अंश सेल्सियस तापमान नोंदवले. तर इतर शहरात पारा चाळीशीच्या आत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात तापमानाने नवे विक्रम प्रस्थापित केले. खासगी हवामान अभ्यासकांच्या मदतीने जिल्ह्यातील नवे उष्ण भाग समोर आले. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली नजीकच्या पलावा भागात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात तापमानात घट पहायला मिळाली. बुधवारी पश्चिमेतून येणाऱ्या वाऱ्यांना उशीर झाल्याने ठाणे जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली होती. गुरुवारी मात्र तापमानात किंचित घट नोंदवली गेली. जिल्ह्यातील सरासरी तापमान ३९ अंश सेल्सियस इतके होते. तर नेहमीप्रमाणे पलावा भागात सर्वाधिक म्हणजे ४० अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. त्या खालोखाल भिवंडी शहरात ३९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर उल्हासनगर, डोंबिवली, तळोजा, पनवेल आणि बदलापूर शहरात पारा ३८ अंश सेल्सियस वर पोहोचला होता. पश्चिम वारे पोचायला दुपार होत असल्याने तापमानात वाढ दिसून येते आहे. मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात तापमानात घटच नोंदवली गेली आहे, अशी माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली आहे.

तापमान (अंश सेल्सियस)
पलावा४०
भिवंडी३९
कल्याण३८.७
बदलापूर३८.५
उल्हासनगर३८.५
डोंबिवली३८.३
पनवेल३८
ठाणे३७.५
मुंब्रा३७.३
कोपरखैरणे३६.७

समुद्रापासून लांब असलेल्या घाट पायथा म्हणजे कर्जत, कसारा या पट्टय़ात उन्हाची तीव्रता अधिक दिसून येते, असेही मोडक यांनी स्पष्ट केले आहे. तर ठाणे ते बदलापूर ही शहरे चाळिशीच्या आत राहत आहेत, असेही मोडक म्हणाले. कर्जत शहरात गुरुवारीही ४२.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slight drop in temperature in thane district rmt
First published on: 05-05-2022 at 19:08 IST