ठाणे शहर परिसरातील ६० टक्के प्रस्ताव प्रत्यक्षात आल्याचा प्रशासनाचा दावा; तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरातील झोपडपट्टय़ांच्या पुनर्वसनाकरिता एका वर्षांत सर्वेक्षण पूर्ण करण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने घेतला आहे. यामुळे ठाणे शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला आता चालना मिळू शकणार आहे. ठाणे, कळवा आणि मुंब्रा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या माध्यमातून रखडलेल्या प्रकल्पांमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर केल्या जातील, अशी माहिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे आयुक्त असीम गुप्ता यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे तिन्ही शहरे झोपडपट्टीमुक्त होणार आहेत.
ठाणे शहरातील झोपडपट्टय़ांचे एका वर्षांत सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असून त्यानुसार झोपडय़ांच्या पुनर्वसन योजनेची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे आयुक्त असीम गुप्ता यांनी दिली. तसेच शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागातील झोपडपट्टय़ांच्या पुनर्वसनासंबंधीचे १०६ प्रस्ताव आतापर्यंत प्राधिकरणाकडे दाखल झाले असून, त्यापैकी ६० टक्के प्रस्ताव प्रत्यक्षात राबविण्यात आले आहेत. उर्वरित प्रस्ताव काही तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित आहेत. मात्र या प्रस्तावांमधील तांत्रिक अडचणींचा आढावा घेऊन ते तातडीने दूर करण्याचे काम सुरू आहे. जेणे करून हे प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लागू शकतील, असेही त्यांनी सांगितले.
भोगवटा प्रमाणपत्र लवकरच
झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांचा राहणीमानाचा दर्जा उंचावावा म्हणून शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या माध्यमातून घरे उभारली जाणार आहेत. याकरिता शहरातील झोपडपट्टय़ांचे सर्वेक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम एका वर्षांत पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये नागरिकांनी या योजनेत सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय, या योजनेंतर्गत शहरामध्ये इमारती उभारल्या असून त्यापैकी काही इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही. ही प्रक्रिया लवकर पूर्ण केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणेकरांच्या मुंबई फेऱ्या वाचणार
ठाणे येथील मानपाडा भागात भाजी मंडईसाठी उभारलेल्या इमारतीमध्ये ठाणे शहरासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे स्वतंत्र नवे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्राधिकरणाचे आयुक्त असीम गुप्ता, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापालिकेचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यालयातील कामकाजासाठी महापालिकेतील काही अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन संबंधीचे प्रस्तावांना याच कार्यालयातून मान्यता दिली जाणार आहे. त्यामुळे अशा प्रस्तावांसाठी आता ठाणेकरांना मुंबईला खेटे घालावे लागणार नाहीत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slum rehabilitation authority will a survey for slum free city
First published on: 12-04-2016 at 05:04 IST