ठाणे : येथील नौपाडा मधील सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी येऊर येथील अनंताश्रमातील शेतात उतरून, बियाणे पेरत प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेतला. नवीन शैक्षणिक धोरणा अंतर्गत कौशल्य विकास या संकल्पनेवर आधारित ‘पेरणी ते कापणी’ हा उपक्रम दर शनिवारी पार पडणार आहे.
ठाण्यामधील नौपाडा परिसरात असणाऱ्या सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांना कौशल्य विकास या संकल्पनेने सर्व गोष्टींचे प्रात्यक्षिक ज्ञान प्राप्त व्हावे या हेतूने विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करून अंदाजपत्रक तयार करणे, घराचे आर्थिक नियोजन, चिमुकल्यांसाठी साक्षरतेची जत्रा असे अनेक उपक्रम पार पडत असतात. अशाचप्रकारे विद्यार्थ्यांना शेतीविषयक कामांची माहिती व्हावी, कृषी क्षेत्राबद्दल जागृकता निर्माण व्हावी, शेतकऱ्यांच्या कष्टाचे महत्त्व कळावे अशा विविध हेतूने ‘पेरणी ते कापणी’ हा उपक्रम राबविला जातो. यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्ष असून ठाण्यातील येऊर येथील अनंताश्रम येथे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना शेतीच्या कामाल सुरूवात करण्यापुर्वी मुळ बियाणांबाबत माहिती देण्यात आली. या बियाणांची माहिती घेऊन विद्यार्थी शेतात उतरले. एका समांतर रांगेत विद्यार्थ्यांनी बियाणांची पेरणी केली. शेतीचा अनुभव घेत असताना विद्यार्थी या कामात रंगून गेल्याचे चित्र होते.
यंदाच्या वर्षी ‘राज्य शासनाच्या आनंदी शिक्षण’ या योजने अंतर्गत दर शनिवारी हा उपक्रम पार पडणार आहे. या उपक्रमाच्या शुभारंभास नकताच करण्यात आला. या उपक्रमात शेती शिक्षण शाळेची माजी विद्यार्थिनी सीमा हर्डीकर, अनंताश्रमाचे संकेत बोराटे आणि वीरेंद्र राठौर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
प्रतिक्रिया
नवीन शैक्षणिक धोरणा अंतर्गत असलेल्या कौशल्य विकास या संकल्पनेचा यंदाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. सहशैक्षणिक उपक्रम म्हणून शाळा शेती शिक्षण उपक्रम राबवित आहे. सुरेंद्र दिघे, कार्यकारी विश्वस्त, सरस्वती मंदिर ट्रस्ट, ठाणे</p>