ठाणे: मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या निर्माणासाठी ३६ तासाचा मेगाब्लॉक शनिवारी दुपारपासून मध्य रेल्वेने सुरू केला आहे. सोमवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान कळवा, मुंब्रा, दिवा येथील प्रवाशांसाठी टीएमटीच्या तर, कोपर आणि ठाकुर्ली येथील प्रवाशांसाठी केडीएमटीच्या विशेष बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे.
मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉक दरम्यान कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकात उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेने तसेच कल्याण डोंबिवली पालिकेच्या परिवहन उपक्रमाने प्रवाशांसाठी विशेष बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे. कळवा, मुंब्रा आणि दिवा येथील प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे रेल्वे स्थानक परिसर ते मुंब्रा रेल्वे स्थानक या मार्गावर दिवसभरात २३० बसफेऱ्या होणार आहेत. तर, चेंदणी कोळीवाडा ते दिवा या मार्गावर दिवसभरात १०२ बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाश्यांची गर्दी वाढल्यास, या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ करण्यात येईल, अशी माहिती ठाणे महापालिका परिवहन विभागाकडून देण्यात आली.
केडीएमटी बस सेवा कोपर आणि ठाकुर्ली येथील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाने विशेष १० बस डोंबिवली ते कल्याण व्हाया ठाकुर्ली मार्गे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासी संख्या वाढली तर, वाढीव बस सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक संदीप भोसले यांनी दिली. कल्याणहून डोंबिवलीला येणारी बस पत्रीपुलावरुन ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यामार्गे ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील प्रवासी घेऊन बंदिश हॉटेल, घरडा सर्कल मार्गे डोंबिवलीत येईल. डोंबिवलीतून प्रवासी घेऊन बस घरडा सर्कलमार्गे रेल्वे स्थानक म्हसोबा चौकातून ९० फुटी रस्त्याने कल्याण येथे जाईल, असे भोसले म्हणाले. कोपर ते डोंबिवली अंतर १० मिनिटाचे आहे. या स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असते. याठिकाणाहून रिक्षा सुविधा उपलब्ध आहे.