संत मायकल चर्च, माणिकपूर

माणिकपूर चर्च हे माणिकपूर गावाचे भूषण मानले जाते. या गावाचे मूळ नाव पुरी होते. इतिहासात पुरी या नावानेच या गावाचा उल्लेख केला जातो. तसेच या चर्चच्या समोर जुन्या खाचांवरजे धोंडे बसविण्यात आले आहेत तेथे गावाचा उल्लेख पुरी म्हणूनच करण्यात आला आहे. हे गाव वसई स्टेशन लगत असलेल्या नवघर गावाच्या पश्चिमेला वसलेले आहे. नवघर गावाचे नाव त्या घरात असलेल्या नऊ घरांमुळे पडले आहे. माणिकपूरमध्ये मात्र बरीच घरे होती.

१६०६ मध्ये या पुरी गावात एक झोपडीवजा चर्च उभे राहिले. पुढे ते गावाच्या मध्यभागी हलवण्यात आले. या विभागातील लोक पूर्वी सांडोर येथील संत थॉमस चर्च येथे प्रार्थनेसाठी जात असत. आर्च बिशप आलेक्सियो मेनेजिस यांनी हे चर्च बांधले. १७३७ मध्ये चिमाजी आप्पा वसईवर चढाई करून येईपर्यंत येथे जेजुईट्स फादर यांची संख्या मोठी होती. त्यांनी दिवाणमान, नायगाव, उमेळमान या गावांसाठी पुरी येथे मध्यभागी मोठे चर्च उभे केले. ते संत मायकल या अग्रदूताला समर्पित करण्यात आले म्हणून या चर्चचे नाव ‘संत मायकल चर्च’ असे आहे. गोखिवरे, सातीवली, आचोळे व राजीवली येथील ख्रिस्ती बांधवही या चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येत. वसईतील इतर धर्मग्रामांच्या मानाने या धर्मग्रामचे खास वैशिष्टय़ म्हणजे इथे परदेशी मिशनरी फादर होते. त्यांनी या गावातील तरुणांना व्यावसायिक शिक्षणात नैपुण्य मिळविता यावे म्हणून एक आगळी वेगळी शिक्षण संस्था स्थापन केली. तसेच जवळच असलेल्या निर्मला माता या सिस्टरांच्या शिक्षण संस्थेने महिलांसाठी शिवण क्लासेस सुरू केले. या गावात गोव्याहून आलेल्या संगीतप्रेमी रेजिनाल्ड मास्टर यांनी तेथील विद्यार्थ्यांना व्हायोलिनवादनामध्ये पारंगत केले. त्यांच्या नावाने एक शिक्षणसंस्था बांधून त्यांचे चिरस्मारक उभारण्यात आले आहे. या संगीतप्रेमी माणसाचा चर्चसमोरच दफनविधी पार पडला.

गावाच्या मध्यभागी असलेले तलाव फादर बेनेड्डीट्टी यांच्या श्रमदानातून पूर्ण झाले. त्यांच्याबाबतचे ऋणनिर्देश म्हणून ग्रामस्थांनी त्या तळ्याला त्यांचे नाव बहाल केले. या गावात बरेच मल्याळी ख्रिस्ती येऊन राहिले. त्यामुळे गावाची मणिपुरम अशी नवी ओळख बनली. या चर्चचे अंबाडी, बऱ्हामपूर, उमेळा हे नवीन विभाग करण्यात आले आहेत. या गावाचे वैशिष्टय़ म्हणजे या गावात अनेक पिढय़ा एकत्र, गुण्यागोिवदाने आणि विविध व्यवसाय करत राहत आहेत. त्यात वाडीत काम करणारे जसे वाडवळ आहेत. तसेच शेतीत काम करणारे कुणबी आहेत. मातीत हात मळणारे कुंभार आहेत व अन्य सेवा देणारे न्हावी, धोबी इत्यादी व्यवसायाचे लोक आपली उपजीविका चालवत आहेत. या २६ जानेवारीला राजपथावर नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ब्रह्मोज या मिसाइलला ज्याने प्रमुख म्हणून सलामी दिली ते कप्तान सुनिथ लोपिस याच गावचे.

आपल्या हातातील भाल्याने सैतानाला पायाखाली तुडवून त्याच्यावर विजय मिळविणारा संत मायकल यांची भव्य दिव्य मूर्ती चर्चच्या मुख्य वेदीवर आहे. चर्चलगतच सेंट झेवियर ही नावाजलेली शिक्षण संस्था आहे. फादर शिरेकर हे सध्या प्रमुख धर्मगुरू असून त्यांना अन्य ५-६ धर्मगुरूंची साथ आहे. या गावात १६७६ कुटुंबे असून ६५९३ इतकी लोकसंख्या या धर्मग्रामात आहे. वसई पंचक्रोशीत सर्वात जास्त लोकसंख्या असलेले धर्मग्राम असा त्याचा लौकिक आहे.