दादर येथील जनरल एज्युकेशन संस्थेच्या (दादर) डोंबिवलीतील स. वा. जोशी शैक्षणिक संकुलातील ब्लाॅसम इंटरनॅशनल शाळेत १५० आसन क्षमतेच्या अत्याधुनिक प्रेक्षागृहाची उभारणी करण्यात आली आहे. अत्याधुनिक तांत्रिक पध्दतीने बांधलेले डोंबिवली परिसरातील हे पहिलेच प्रेक्षागृह आहे. शाळेच्या कार्यक्रमासह शहर परिसरातील विविध संस्था, संघटना, नाट्य संस्था यांना विविध कार्यक्रमांसाठी हे प्रेक्षागृह परिषद, बैठक, कार्यक्रमांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती जनरल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डाॅ. उल्हास कोल्हटकर यांनी दिली.

संस्थेचे संस्थापक दिवंगत गोपाळ नारायण अक्षीकर यांचे प्रेक्षागृहाला नाव देण्यात आले आहे. या प्रेक्षागृहाचे उद्घाटन रविवारी (ता.१८) सकाळी पावणे दहा वाजता शीवच्या लो. टिळक रुग्णालयाचे माजी डीन व ज्येष्ठ शल्यविशारद डाॅ. अविनाश सुपे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कार्यकारी अध्यक्ष शैलेंद्र साळवी, उपकार्याध्यक्ष प्रदीप गोसावी, सचिव प्रकाश अधटराव यांच्या उपस्थितीत होणार आहे.सर्व तांत्रिक सोयीसुविधांनी युक्त एक अत्याधुनिक प्रेक्षागृह शहरात असावे असा विचार संस्था अध्यक्ष डाॅ. कोल्हटकर यांनी व्यवस्थापन मंडळासमोर मांडला. तो मंजूर करण्यात आला. शालेय उपक्रमांबरोबर संस्थांना अत्याधुनिक पध्दतीचे वातानुकूलित, संतुलित ध्वनीफेक, संवर्धक प्रेक्षागृह डोंबिवलीत उपलब्ध होणार असल्याने नाट्य संस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

१३० वर्षाचा इतिहास असलेल्या जनरल एज्यकेशन संस्थेकडून शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. डोंबिवलीत स. वा. जोशी शाळा संकुल आवारात संस्थेने शहर परिसरातील विद्यार्थ्यांना उच्चतम पध्दतीचे शिक्षण बालवर्गा पासून मिळावे यासाठी ब्लाॅसम इंटरनॅशनल शाळा संस्थेने सुरू केली आहे. २०१२ मध्ये ३५ विद्यार्थी घेऊन सुरू केलेल्या या शाळेत आता बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या मुलांना विविध उपक्रमांसाठी या प्रेक्षागृहाचा वापर करता येणार आहे, असे डाॅ. कोल्हटकर यांनी सांगितले. यावेळी उपकार्याध्यक्ष प्रदीप गोसावी, संचालक मंडळ सदस्य विकास पुराणिक, संजय कानिटकर, गजानन बागुल, प्राचार्या नीलजा पाटील, उपप्राचार्या तृप्ती तोमर उपस्थित होते.

प्रेक्षागृह सुविधा

संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा, उत्तम ध्वनी संवाद फेक यंत्रणा, प्रेक्षपण व्यवस्था, एलईडी पडदा, टेले प्राॅम्पटर, आकर्षक मंच, नियंत्रक कक्ष.

प्रस्तावित प्रकल्प

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्लाॅसम शाळेत अत्याधुनिक ग्रंथालय, रोबोटिक ग्रंथालय, भाषा प्रयोग प्रशिक्षण केंद्र, पर्यावरण शाळा, गॅस्ट्राॅनाॅमी प्रयोगशाळा, नृत्य संगीत प्रयोगशाळा, क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.