कल्याण- सावत्र मुलीचे प्रियकरा बरोबरचे प्रेमसंबंध. त्यातून होत असलेले वाद. या वादातून मुलीने फिनेल प्यायले. रुग्णालयात उपचार घेत असताना मुलीने पोलिसांना जबाब देताना सावत्र वडिल लैगिंक अत्याचार करतात असा आरोप केला. या आरोपांतून सावत्र वडिलांना पोलिसांनी अटक केली. अखेर सात वर्षानंतर मुलीने सावत्र वडिलांवर केलेले आरोप न्यायालयात टिकले नाहीत.

कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. डी. हरणे यांनी बलात्काराचा आरोप असलेले डोंबिवली निवासी विपुल नारकर (२८) यांची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या रामनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या तपासावर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रतिवादी विपुल नारकर यांची बाजू न्यायालयात अधिवक्ता गणेश घोलप यांनी मांडली. ॲड. स्वप्निल चौधरी, ॲड. मोनिका गायकवाड यांनी ॲड. घोलप यांना साहाय्य केले.

ॲड. गणेश घोलप यांनी सांगितले, मुंबईत छापखान्याचा व्यवसाय करणाऱ्या विपुल यांची काळीचौकी (मुंबई) येथे खानावळ चालविणाऱ्या एका ३४ वर्षाच्या घटस्फोटीत महिलेशी तिच्या भावाच्या मध्यस्थीने ओळख झाली. या महिलेला १५ वर्षाची मुलगी, १८ वर्षाचा मुलगा आहे. ओळखीचे रुपांतर दोघांच्या प्रेमात झाले. विपुलने घटस्फोटीत महिलेसह तिच्या मुलांचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. या कुटुंबाला विपुलने डोंबिवलीतील आयरे गाव भागात पागडी पध्दतीने चार लाख रुपये खर्चून घर घेऊन दिले. मुलांना डोंबिवलीतील शाळेत प्रवेश करुन दिला.

घरगुती वादातून मुलीने सावत्र वडील विपुल नारकर यांना अडचणीत आणण्याचा निर्णय घेतला. ‘सावधान इंडिया’ दूरचित्रवाणीवरील मालिका बघून मुलीला ही कल्पना सुचली. मी प्रियकरा सोबत फिरते. मोबाईलमधील अश्लिल चित्रफित दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी देत सावत्र वडील बलात्कार करत होते, अशी तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात मे २०१५ मध्ये केली. ही तक्रार करताना मुलीने फिनेल प्यायले होते. वडिल आपल्यावर अत्याचार करतात. त्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलले अशी तक्रार पीडित मुलगी करत होती. तक्रार दाखल होताच रामनगर पोलिसांनी मुलीचे सावत्र वडील विपुल नारकर यांना अटक केली. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस अधिकाऱ्याने करण्याऐवजी याच पोलीस ठाण्यातील नितीन मुदगून या उपनिरीक्षकावर सोपविण्यात आला. पुरुष डाॅक्टरांनी या मुलीची वैद्यकीय तपासणी केली, असे ॲड. घोलप यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

सरकार पक्षातर्फे पीडिता, तिचा भाऊ, प्रियकर, शाळा मख्याध्यापक असे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. पीडितने आपल्या बाजुने साक्ष देण्यासाठी आपला दुसरा प्रियकर, घटस्फोट घेतलेले वडील यांनाही बोलविले होते. उलट तपासणीमध्ये मुलीने बलात्कार झाल्याने नव्हे तर फिनेल प्यायालयाने उपचारासाठी रुग्णालयात दाखल होते. विपुल यांनी घेतलेेले घर विकले होते. बलात्कार झाल्याचा अहवाल तपास कागदपत्रांमध्ये नव्हता, असे ॲड. घोलप यांनी सांगितले.

न्यायालयाने दोन्ही बाजू तपासल्या. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यापासून ते तपासापर्यंत विरोधाभास न्यायालयाला दिसून आला. हे सर्व रचलेले प्रकरण असल्याचे निदर्शनास आल्यावर न्यायालयाने सात वर्ष तुरुंगात असलेल्या विपुल नारकर यांची निर्दोष मुक्तता केली, असे ॲड. घोलप यांनी सांगितले.