लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : येथील शिळफाटा रस्त्यावरील नेकणी पाडा भागातील रस्त्यावरून पायी जाणाऱ्या १५ वर्षाच्या विद्यार्थीनीला भरधाव कारने धडक देऊन गंभीर जखमी केले. मंगळवारी सकाळी सात वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर कार चालक तेथून पळून गेला. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दावडी भागातील एका गृह संकुलात भगवान ठोंबरे हे कुटूंबासमवेत राहतात. त्यांची मुलगी तेजल (१५) ही परिसरातील एका खासगी शिकवणी वर्गात दररोज सात वाजता जाते. मंगळवारी सकाळी ती नेकणी पाडा भागातील रिजन्सी ते कावेरी चौक येथून शिकवणीसाठी पायी जात होती. नेकणी पाडा भागात रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने धडक दिली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

आणखी वाचा-भाजप आमदार गायकवाड यांची मनसे आमदार प्रमोद पाटील यांच्याकडून पाठराखण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहन थांबून जखमी मुलीला मदत करण्याऐवजी कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. पादचाऱ्यांनी या मुलीच्या कुटुंबीयांना संपर्क केला. तिला तातडीने रूग्णालयात नेले. तिचे वडील भगवान ठोंबरे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी कार चालकाचा शोध घेण्याची मागणी ठोंबरे कुटुंबीयांनी केली आहे.