डोंबिवली – स्टाफ सिलेक्शन कमिशन या सरकारी पद भरतीसाठी स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या संस्थेतर्फे शुक्रवारी केंद्रीय कर्मचारी भरती ग्रुप बी आणि सी पदांसाठी शुक्रवारी राज्याच्या विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. डोंबिवली एमआयडीसीत मानपाडा पोलीस ठाण्याच्या बाजुला या परीक्षेसाठी एक केंद्र होते. राज्याच्या विविध भागातून या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी, त्यांचे पालक आले होते. पण एमआयडीसीतील या परीक्षा केंद्राबाहेरील उग्र दुर्गंधी, बाहेर बसण्यासाठी नसलेली व्यवस्था, वाहनांच्या सतत उडणाऱ्या धुळीमुळे विद्यार्थी, पालक त्रस्त होते.

राज्याच्या विविध भागातून विद्यार्थी डोंबिवली एमआयडीसीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या बाजुच्या सुरेखा इन्फोटेक या परीक्षा केंद्रात परीक्षा देण्यासाठी आले होते. सकाळी साडे सात वाजल्यापासून परीक्षेच्या प्रक्रिया सुरू होणार असल्याने दूरवरचे परीक्षार्थी तरूण, तरूणी, त्यांचे पालक, नातेवाईक पहाटे पाच ते सहा वाजताच एमआयडीसीतील या परीक्षा केंद्राजवळ आले होते. परिसरात नसलेले सुस्थितीमधील हाॅटेल, चहापान व्यवस्था यामुळे विद्यार्थी, पालक त्रस्त होते. जवळपास कुठेही स्वच्छता गृह नसल्याने परीक्षार्थी, पालकांची कुचंबणा झाली.

परीक्षा केंद्र एमआयडीसी भागात असल्याने या भागात कोठेही बसण्यासाठी चांगली व्यवस्था नव्हती. परीक्षा केंद्रात प्रवेश मिळविण्यासाठी सकाळी साडे सात वाजल्यापासून सुरूवात झाली. तोपर्यंत विद्यार्थी, पालक यांना परीक्षा केंद्राबाहेर ताटकळत उभे राहावे लागले. या कालावधीत परीक्षा केंद्र परिसरात वाहणारे गटार, त्यामधील दुर्गंधी, अस्वच्छता, कल्याण शिळफाटा मुख्य वर्दळीच्या रस्त्याजवळ हे केंद्र आहे. त्यामुळे वाहनांच्या सततच्या उडणाऱ्या धुळीमुळे पालक त्रस्त होते.

परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचता यावे म्हणून पुणे परिसरातून विद्यार्थी पहाटे साडे तीन ते चार वाजण्याच्या दररम्यान प्रवासासाठी निघाले होते. अनेक परीक्षार्थी खासगी वाहने करून, काही रेल्वेने परीक्षा केंद्र ठिकाणी पोहचले होते. परीक्षा केंद्राच्या परिसरात पोहचल्यावर आपण बाजुच्या हाॅटेल, उपहागरगृहात जाऊन ताजेतवाने होऊ अशी अनेक परीक्षार्थी, विद्यार्थ्यांची अपेक्षा होती. पण परीक्षा केंद्र एमआयडीसी परिसरात असल्याने आजुबाजुला चहानाष्टा, उपहारगृह, हाॅटेलची सोय नसल्याने पालक, विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.

विद्यार्थी परीक्षा केंद्रात गेल्यावर अनेक पालकांनी औद्योगिक क्षेत्रातील झाडे, कंपन्यांच्या बाहेरील निवारा यांचा आधार घेऊन विश्रांतीसाठी बसणे पसंत केले. अशा स्पर्धा परीक्षा घेताना स्टाफ सिलेक्शन कमिशनसह इतर संस्थांनी किमान ते परीक्षा केंद्र शहराच्या मध्यवर्ति ठिकाणी विद्यार्थी, पालक यांना सोयीस्कर असेल असे बघणे गरजेचे आहे, अशा मागण्या अनेक पालकांनी केल्या.