सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल नागरिकांत समाधान
दहीहंडीची उंची आणि वयाची मर्यादा याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनंतर ठाण्यातील बडय़ा दहीहंडी आयोजकांनी सपशेल माघार घेण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने पाचपाखाडी भागात केला जाणारा दहीहंडी उत्सव सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ठाण्यातील अन्य दहीहंडी आयोजकांनीही सावध पवित्रा घेत, पुढील दोन-तीन दिवसांत दहीहंडी आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्याचे ठरवले आहे.
दहीहंडी उत्सव म्हणजे थरांच्या स्पर्धा, बक्षिसांचा वर्षांव, अभिनेते कलाकारांच्या हजेऱ्या, २४ तास वाहिन्यांचा रतिबा, शहर विद्रूपीकरण आणि कानठिळ्या बसवणारा धिंगाणा असे चित्र गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहरात निर्माण झाले होते. ठाण्यातील काही नेत्यांनी दहीहंडीचा उत्सव जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा चंग बांधत सकाळ पासून मध्यरात्रीपर्यंत दहीहंडीची सर्कस सुरू केली होती. त्यामुळे दहीहंडी भरवण्यात येणाऱ्या परिसरातील नागरिकांना मात्र एक दिवस घरातच तुरुंगवास भोगावा लागत होता. जनरेटरच्या गाडय़ा, डीजेचा आवाज आणि घोषणाबाजी यांचा त्रास त्यात भर टाकत होता. या पाश्र्वभूमीवर ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी केलेल्या जनहित याचिकेची दखल घेत न्यायालयाने गेल्या वर्षीच दहीहंडी आयोजनावर र्निबध आणले. त्यामुळे गेल्या वर्षीपासून दहीहंडी उत्सवाचा अतिउत्साह मावळू लागला होता. गेल्या वर्षी दुष्काळाचे कारण देऊन संघर्ष संस्थेचे जितेंद्र आव्हाड यांनी दहीहंडी साजरी न करण्याची घोषणा केली तर यंदा वाढदिवसाच्या दिवशी दहीहंडी रद्दचा निर्णय जाहीर केला. शिवसेनेच्या नेत्यांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या दहीहंडीबाबतही लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
कोंडमाऱ्यातून सुटका..
पाचपाखाडी येथे भरणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या काळात प्रदीप सोसायटी या भागात राहणाऱ्या रहिवाशांचा कोंडमारा होत होता. आमची इच्छा नसताना आम्हाला जणू डांबून टाकले जात होते. मागच्या वर्षी आणि यंदा उत्सव रद्द झाल्यामुळे या त्रासातून आमची सुटका झाली आहे.
– नारायण काळे, पाचपाखाडी
थिल्लरपणा आणि राजकीय हस्तक्षेपाला विरोध..
पारंपरिक सण उत्सवांच्या आम्ही विरोधात नसून या सण आणि उत्सवांमध्ये सुरू झालेल्या थिल्लरपणा आणि राजकीय हस्तक्षेपाला आमचा कायम विरोध आहे. कायद्याने त्याला बळ दिल्यामुळे हा थिल्लरपणा नक्कीच कमी होईल आणि सण पूर्वीसारखे साजरे होतील. शासनाने दहीहंडीचा दर्जा दिला असला तरी त्याच्या विकासासाठी वर्षभरामध्ये काहीच केले नाही. खेळ आहे तर मग तो रस्त्यावर नाही तर मैदानामध्ये खेळण्याची गरज आहे. साहसाला आमचा विरोध नसून त्यातील उपद्रवाला आमचा विरोध आहे.
– डॉ. महेश बेडेकर, जनहित याचिकाकर्ते

