बदलापूर: ज्याप्रमाणे केंद्रीय मंत्र्यांना पराभूत करून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे जायंट किलर ठरले. तसेच सुभाष पवारही मुरबाड विधानसभा मतदारसंघात विजयी होत जायंट किलर होणार, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार सुभाष पवार यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे बदलापुरात आल्या होत्या. त्यावेळी सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले.

मुरबाड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान भाजप आमदार किसन कथोरे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून सुभाष पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी खासदार सुप्रिया सुळे बदलापुरात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले. बदलापुरात झालेल्या दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या प्रकरणावरून सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीसांनी बदलापूरचे नाव बदनाम केले. ते नाव आता सुधारायचे आहे. त्यासाठी निवडून आल्यावर सहा महिन्यात काम करा, अशा सूचना त्यांनी सुभाष पवार यांना केल्या. राज्यभर महिलांना पाणी, महागाईच्या प्रश्नावर तोंड द्यावे लागते आहे. आम्हाला बुलेट, मेट्रो ट्रेन नको, पण शाळेसाठी पाण्यासाठी पैसे द्या असे सांगत सुळे यांनी सरकारवर टीका केली. आज आमच्या महिला, नोकरदार वर्गाला लोकलमध्ये बसायला जागा नाही. आधी ते प्रश्न सोडवा मग बुलेट ट्रेन द्या, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा – ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत

सत्ताधारी पक्षाचे लोक वाटायला आले तर घ्या, असेही ते त्यांचे नाही आपलेच आहे असे सांगत सुप्रिया सुळे यांनी लक्ष्मी दर्शनाला नकार देऊ नका असे संकेत दिले. मात्र पुढे आपण चहाबद्दल बोलतोय अशीही पुस्ती त्यांनी जोडली. लोकसभा निवडणुकीत सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी केंद्रीय मंत्र्याचा पराभव केला आणि जायंट किलर ठरले. आता सुभाष पवारही त्यांच्याप्रमाणेच जायंट किलर ठरतील, असे भाकीत सुप्रिया सुळे यांनी यावेळी केले.

हेही वाचा – वंचितचा कुणालाही पाठिंबा नाही, उमेदवारासाठी वंचित समर्थपणे रिंगणात, अफवांना पूर्णविराम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निलेश लंकेची फटकेबाजी

या सभेत अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी केली. मुरबाड मतदारसंघ माझ्यासाठी जवळचा आहे. मुंबईला येण्यासाठी मला याच मतदारसंघातून यावे लागते. घाटातून खाली उतरल्यानंतर खड्डा लागला की मी समजतो मुरबाड मतदारसंघ सुरू झाला, असे सांगत निलेश लंके यांनी आमदार किसन कथोरे यांच्यावर टीका केली. दहा वर्षांपूर्वी एका नातेवाईकाकडे आलो होतो. तेव्हा ऐकले होते माळशेजमध्ये काचेचा पूल होणार आहे. अजून तो पूल झालेला नाही. ही काय लबाडी आहे, असा प्रश्नही यावेळी लंके यांनी उपस्थित केला.