ठाण्यातील डायघर येथून  हस्तगत केलेल्या  ५९ बॉम्बपैकी ११ बॉम्ब बुधवारी  एनएसजी कमांडोंनी निकामी केले.  डायघर येथील ठाकूरपाडा परिसरात उद्या देखील बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरुच राहणार आहे. दोन वर्षापूर्वी डायघर येथून शिळफाटा डायघर पोलीस आणि ठाणे गुन्हे अन्वेषन विभागाने एका भंगारच्या दुकानातून ५९ बॉम्ब हस्तगत केले होते. या हस्तगत केलेल्या बॉम्बची पुष्टी करण्यासाठी पोलिसांनी हे बॉम्ब भाभा ऑटोमिक संशोधन केंद्राकडे पाठवले होते. हे बॉम्ब जिवंत असल्याची पुष्टी झाल्यानंतर शिळफाटा डायघर पोलिसांनी  हे बॉम्ब एनएसजी टीमच्या हवाले केले. दोन दिवसांत हे बॉम्ब निकामी करण्याच काम एनएसजीची तुकडी करणार आहे. आज सकाळी एनएसजीच्या तुकडी ने ११ बॉम्ब निकामी केले असून उर्वरित ४८ बॉम्ब उद्या सकाळी निकामी करण्यात येणार आहेत. ठाणे बॉम्ब शोधक पथक आणि डायघर पोलीस यांच्या समवेत एनएसजीच्या टीमने डायघर येथील ठाकूरपाड्याच्या खदानीत बॉम्ब निकामी करण्याचे काम सकाळपासून सुरु केले. बॉम्ब निकामी करत असताना एका बॉम्बचा स्फोटही झाल्याचे समजते. मात्र, या स्फोटात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. हा स्फोट इतका मोठा होता की,  स्फोटमुळे या ठिकाणी एक मोठा खड्डा तयार झाला आहे.

बॉम्ब निकामी करण्यासाठी  एनएसजीची टीम आज सकाळी ठाण्यात दाखल झाली.  हे बॉम्ब भंगारवाल्याकडे आले कुठून? हे बॉम्ब कशासाठी आणले होते? या मागे उद्देश काय होता? कुठली दहशतवादी संघटना यात सहभागी तर नाही ना? या सर्व प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे अन्वषन विभाग, ठाणे बॉम्ब शोधक पथक आणि शिळफाटा डायघर पोलीस करत आहेत.⁠⁠⁠⁠