ठाणे : कोलशेत येथील आझादनगर तडीपार आरोपीने पोलिसावर हल्ला केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. प्रसाद राऊत (२५) असे हल्लेखोराचे नाव असून त्याच्याविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

आझादनगर भागात राहणारा प्रसाद राऊत हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याला ठाणे पोलीसांनी १८ मे २०२४ पासून दीड वर्ष तडीपार केले होते. दरम्यान प्रसाद राऊत हा सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आझादनगर भागात गुन्हा घडविण्यास येणार असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कापूरबावडी पोलीसांचे पथक त्याला पकडण्यासाठी आझादनगर येथे पोहचले होते.

पथकातील पोलीस हवालदार राकेश भोर हे त्याला पकडण्यासाठी गेले असता, त्याने भोर यांना धक्का मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. धक्का दिल्याने भोर हे खाली पडले. त्यानंतर इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसाद याला पकडले. त्याची चौकशी करुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी प्रसाद याच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १४२ आणि भारतीय न्याय संहिता (बी एन एस) २०२३ चे कलम १३२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.