अंबरनाथ: अंबरनाथ रेल्वे यार्डात लोकल प्रवेशावरून प्रवासी आणि रेल्वे प्रशासनात संघर्ष झाल्यानंतर प्रवाशांनी उलट प्रवास करून जागा अडवणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आता मनसेनेही यात उडी घेतली असून अंबरनाथहून मुंबईसाठी सुटणाऱ्या लोकलमध्ये उलटे बसून येणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने अंबरनाथ रेल्वे स्थानक व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे. तसेच तातडीने कारवाई न झाल्यास मनसे समर्थ आहे, असा इशाराही मनसेने रेल्वे प्रशासनाला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच अंबरनाथ रेल्वे स्थानकातील यार्डात लोकल प्रवेशावरून मोठा वादंग झाला होता. दोन दिवस लोकल अडवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने केली आहे. मात्र लोकलमधील जागेवरून सुरू झालेल्या वादंगात उलट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रश्न प्रकाशझोतात आला.

हेही वाचा… नौपाडा-कोपरीत गढुळ पाण्याचा पुरवठा; पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे पालिकेचे आवाहन

सकाळी ऐन गर्दीच्या वेळी अंबरनाथहून सीएसएमटी साठी सुटणाऱ्या ७.१७, ७.३५, ८.१०, ८.२७ आणि ८.४९ या लोकल्समध्ये उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकातून बहुतांशी प्रवासी उलटे बसून येतात. त्यामुळे अंबरनाथच्या प्रवाशांना या लोकलमध्ये बसायला जागा मिळत नाही. या उलटे बसून येणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांची होती. त्यावरून प्रवासी आक्रमकही झाले.

हेही वाचा… ठाणे महापालिकेतील ८८० पद भरतीचा मार्ग मोकळा

आता या वादात मनसेने उडी घेतली आहे. अशा प्रवाशांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी अंबरनाथ मनसेने केली आहे. अंबरनाथहून सुटणाऱ्या लोकलवर अंबरनाथकरांचाच अधिकार असून उलटे बसून येणाऱ्यांनी अंबरनाथपासूनचे पास जरी काढले असतील, तरी त्यांना उतरवून अंबरनाथच्या प्रवाशांना आधी बसण्यासाठी जागा दिली जावी, अशी मागणी मनसेने केली आहे. रेल्वे पोलिसांनी कारवाई न केल्यास आम्ही समर्थ आहोत, असा इशाराही मनसेने दिला आहे. याबाबतचे पत्र अंबरनाथचे रेल्वे स्टेशन मास्टर आणि रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर, उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के, जिल्हा संघटक संदीप लकडे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव, अंकित कांबळे, योगेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take action against passengers traveling in reverse demand by mns after the agitation in the railway yard ambernath dvr
First published on: 30-06-2023 at 19:01 IST