ठाणे : शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत वाढ होण्याबरोबरच एका रुग्णाचा गुरुवारी मृत्यू झाल्यानंतर पालिकेची यंत्रणा सर्तक झाली असून, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी आरोग्य विभागाला बैठकीत केल्या. शीघ्र प्रतिजन चाचण्यांची संख्या वाढविणे, गर्दीच्या ठिकाणी चाचणी केंद्र सुरू करणे, करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी करणे, बाधित रुग्णांचे विलगीकरण, रुग्ण उपचाराच्या व्यवस्थेसह रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देणे, अशा सूचना बांगर यांनी केल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कमी झालेला करोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. मागील दोन आठवड्यांत जिल्ह्यात १३३ रुग्ण आढळून आलेले असून त्यापैकी ८५ रुग्ण एकट्या ठाणे शहरातील आहेत. रुग्णवाढीत आघाडीवर असलेल्या ठाणे शहरात गुरुवारी एका ८२ वर्षीय रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी सकाळी आरोग्य विभागाची तातडीने बैठक घेतली. त्यात शहरातील करोना परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी आरोग्य विभागाला महत्वाच्या सूचना केल्या आहेत. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये करोना रुग्ण उपचारासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून त्या ठिकाणी अतिदक्षता विभागात पाच खाटांची तर, विलगीकरणासाठी १५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली तर उपचाराची व्यवस्था टप्प्याटप्प्याने वाढविण्यात यावी. करोना काळात घेण्यात आलेल्या कर्मचारी वर्गाला इतर विभागात वर्ग करण्यात आले असून, गरज पडल्यास या कर्मचाऱ्यांना पुन्हा त्या कामासाठी घेण्यात यावे, अशा सूचना बांगर यांनी केल्या.

हेही वाचा – वकिलाच्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी कल्याणमध्ये वकिलांची निदर्शने

ठाणे शहरात सद्यस्थितीत दिवसाला १००० करोना शीघ्र प्रतिजण चाचण्या केल्या जात असून या चाचण्यांची संख्या वाढवून ती २५०० इतकी करण्यात यावी. ठाणे स्थानक तसेच शहरातील गर्दीच्या ठिकाणी चाचणी केंद्र उभारण्यात यावे. आरटीपीसीआर चाचण्याही करण्यात याव्यात. एखादा रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची चाचणी करण्यात यावी. त्यांनी चाचणी करण्यास नकार दिला तर सहाय्यक आयुक्तांनी पथकासह घरी जाऊन त्यांची चाचणी करावी. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही चाचणी करण्यात यावी. बाधित रुग्णांसाठी घरात स्वतंत्र खोली आणि शौचालयाची व्यवस्था उपलब्ध नसेल तर त्यांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. डायलेसीस सुरू असलेली व्यक्ती करोनाबाधित झाली तर, तिला कळवा रुग्णालयातील उपचाराच्या ठिकाणी डायलेसीसची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

ठाणे शहरात एकूण ८५ सक्रीय रुग्ण असून त्यापैकी दोन खासगी रुग्णालयात तर तीन कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित ८० रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच विलगीकरणात आहेत. शहराच्या सर्वच भागांत रुग्ण आढळून येत असले तरी कळवा-खारीगाव आणि मुंब्रा भागात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या भागांमध्ये करोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना बांगर यांनी दिल्या आहेत.

गेगी वाचा – ठाण्यात आढळले इन्फ्ल्युएंझाचे सहा रुग्ण; आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या आयुक्तांच्या सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाण्याच्या वाडीया रुग्णालयात केलेला करोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने ८२ वर्षीय व्यक्तीला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील करोना कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेले चार दिवस या व्यक्तीवर उपचार सुरू होते. त्यांनी करोना लसीच्या तिन्ही मात्रा घेतल्या होत्या. परंतु त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब अशा सहव्याधी होत्या. त्यांचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या कुटुंबियांशी फोनवरून संपर्क साधला. परंतु त्यांचे कुटुंबिय त्यांना भेटण्यासाठी आले नव्हते. ही बाब रुग्णालय प्रशासनाने बैठकीत मांडताच रुग्ण आणि नातेवाईकांच्या संपर्कासाठी मदत कक्ष तयार करण्याची सूचना आयुक्त बांगर यांनी केली. कुटुंबीय किंवा नातेवाईकांशी बोलणे झाले नाही तर रुग्ण खचतो आणि त्यांची प्रकृती खालावते. त्यामुळे असे होऊ नये यासाठीच मदत कक्ष सुरू करण्याची सूचना आयुक्तांनी केली.