ठाणे: मुरबाड तहसील कार्यालयात गेल्या ३६ वर्षांहून अधिक काळ शिपाई म्हणून अविरत सेवा करणारे तातू ठाकरे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेचा अनोख्या पद्धतीने गौरव करण्यात आला. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी, तातू ठाकरे यांना मुरबाडचे तहसिलदार अभिजित देशमुख यांनी आपल्या खुर्चीत बसवून त्यांच्या कार्याचा सन्मान केला. यामुळे तातू ठाकरेंसह तहसील कार्यालयातील प्रत्येक जण अगदी भारावून गेले होते.
शासकिय कार्यालयांमध्ये शिपाई, स्वच्छता कर्मचारी यांच्या सेवा निवृत्तीवेळी संबंधित कार्यालयांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचा अगदी यथोचित सन्मान करण्यात येत असल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर अनेकदा दिसून येतात. तर अनेक मोठ्या वास्तूंचे उद्घाटन देखील अनेकदा मंत्री आणि अधिकारी मंडळी हे त्या वास्तूमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातून करून घेतात. नुकतेच ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी देखील न्यायालयात काम करणाऱ्या स्वच्छता करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याच्या हातून फित कापून उद्घाटन करण्यात आले होते. याच पद्धतीने मुरबाड तहसील कार्यालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या तातू ठाकरे यांचा निवृत्ती सोहळा अगदी विशेष ठरला.
१९८९ मध्ये शिपाई म्हणून रुजू झालेले तातू ठाकरे आपल्या कामाप्रती नेहमीच निष्ठावान राहिले. कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याशी त्यांचे आपुलकीचे संबंध होते. त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी तहसिलदार अभिजित देशमुख म्हणाले की, “तातू ठाकरे यांनी ३६ वर्षांहून अधिक काळ कार्यालयात अत्यंत निष्ठेने काम केले. त्यांनी कधीही वेळेची किंवा कामाची तक्रार केली नाही. शिपाई म्हणून काम करत असतानाही त्यांनी नेहमीच आपले कर्तव्य चोखपणे बजावले. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आणि मदतनीस असल्याने ते सर्वांचेच लाडके होते. तसेच त्यांच्या निवृत्तीचा दिवस असल्याने त्यांच्या या प्रदीर्घ सेवेचा सन्मान म्हणून मी त्यांना माझ्या खुर्चीत बसविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कार्यालयासाठी जे काही केले आहे, त्याची परतफेड पैशांमध्ये होऊ शकत नाही, पण हा एक छोटासा प्रयत्न आहे त्यांच्या कार्याची दखल घेण्याचा.” असे मत यावेळी तहसीलदार अभिजित देशमुख यांनी केले. या अनोख्या सन्मानामुळे तातू ठाकरे भावुक झाले होते. त्यांनी तहसिलदार देशमुख आणि कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.