लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : महापालिकेच्या थकीत मालमत्ता कराची वसुली व्हावी यासाठी डिसेंबर महिन्यातील शेवटच्या पंधरावड्यात लागू केलेल्या अभय योजनेला प्रशासनाने मुदत वाढ दिली आहे. एकूण २४८ कोटींच्या थकबाकीपैकी आतापर्यंत १०१ कोटी ५४ लाखांची वसुली झाली असून त्यातील ३४ कोटी ४८ लाखांची वसुली गेल्या पंधरा दिवसांत अभय योजनेत झाली आहे. उर्वरित १४६ कोटी ४६ लाखांची थकीत रक्कम वसुल करण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. या रक्कमेच्या वसुलीसाठी पालिकेने अभय योजनेला मुदत वाढ देऊन नव्या वर्षात थकबाकीदारांवर कर सवलतींचा वर्षाव केल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिकेच्या यंदाच्या वर्षाच्या अर्थसंकल्पात मालमत्ता करातून ७९२ कोटीचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. हे उद्दीष्ट गाठण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीपासूनच महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ४७१ कोटी ६७ लाख रुपयांची मालमत्ता कराची वसुली झाली आहे. ३२० कोटी ३३ लाखांच्या मालमत्ता कराची वसुली येत्या तीन महिन्यात करण्याचे आव्हान पालिका प्रशासनापुढे आहे. त्याचबरोबर मालमत्ता कराची एकूण थकबाकी २४८ कोटी रुपये इतकी आहे. पैकी आतापर्यंत १०१ कोटी ५४ लाखांची वसुली झाली असून त्यातील ३४ कोटी ४८ लाखांची वसुली गेल्या पंधरा दिवसांत अभय योजनेत झाली आहे. उर्वरित १४६ कोटी ४६ लाखांची थकीत रक्कम वसुल करण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे.

आणखी वाचा-परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

थकीत रक्कमेच्या वसुलीसाठी पालिका प्रशासनाने अभय योजनेला १५ जानेवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे. या मुदतीपर्यंत थकीत तसेच चालू वर्षाचा मालमत्ता एकत्रित महापालिकेकडे जमा करणाऱ्या करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या शास्तीत शंभर टक्के माफ केली जाणार आहे. यापूर्वी, महापालिकेने १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत अभय योजना जाहीर केली होती. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. परंतु, नाताळच्या सुट्या असल्याने ज्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही, अशा नागरिकांनी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे

मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात संकलन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. हि केंद्र कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजता, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व सर्व शनिवार सकाळी १०.३० ते दुपारी ४ वाजता आणि रविवार सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजता खुली राहणार आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेच्या http://www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीमॲप याद्वारे करदाते ऑनलाईन पध्दतीने त्यांचा मालमत्ता कर जमा करू शकतात, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.