बदलापूरः मंगळवारी रात्री उत्तर कोकणसह मुंबई महानगर प्रदेशातील अंतर्गत भागात झालेल्या पावसामुळे सरासरी तापमानात कमालीची घट झाली आहे. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास ठाणे जिल्ह्याचे सरासरी तापमान २१ अंश सेल्सियसवर आले होते. तर पश्चिम विक्षोभाच्या परिणामामुळे या आठवड्यात तापमानात घट दिसून येणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात दिलासादायक तापमान अनुभवास मिळणार आहे.

पश्चिम विक्षोभ सध्या चांगल्या स्थितीत आहे. त्याचा परिणाम म्हणून अरबी समुद्रात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मे महिन्यात सहसा वळव्याचा पाऊस अर्थात पूर्वमोसमी पाऊस पडत असतो. यंदा मात्र पश्चिम विक्षोभामुळे पाऊस पडल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. सहसा मार्च महिन्यात अशा प्रकारे स्थिती निर्माण झाल्यास पाऊस पडत असतो. मात्र यंदा ही स्थिती मे महिन्यात निर्माण झाली आहे. ही वेगळी स्थिती आहे अशीही माहिती मोडक यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली आहे.

मंगळवारी सायंकाळनंतर ठाणे जिल्हात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या काळात वाऱ्याचा वेळ ताशी ५७ किलोमीटरपर्यंत वाढला होता. त्यामुळे अनेक झाडांची पडझड झाली. परिणामी वीज पुरवठ्यावर परिणाम झाला होता. बुधवारीही सकाळपासून पावसाची स्थिती निर्माण झाली. सकाळी अकरानंतर रिमझीम पावसाला सुरूवात झाली होती. दुपारी १२ च्या सुमारास बदलापूर शहरात ६२ किलोमीटर प्रति तासाने वारे वाहत असल्याची नोंद खासगी हवामान अभ्यास अभिजीत मोडक यांनी दिली आहे.

तसेच पश्चिम विक्षोभ आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे येत्या काही दिवसात तापमानात घट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या तापमानात घट झाली असून बुधवारी दुपारी १च्या सुमारास जिल्ह्याचे सरासरी तापमान २१ अंश सेल्सियसवर आले होते. पुढचे तीन ते चार दिवस तापमानात अशीच घट राहणार आहे, असा अंदाज मोडक यांनी वर्तवला आहे. पश्चिम विक्षोभमुळे हा परिणाम जाणवेल. हा प्रभाव कमी झाल्यानंतर पुन्हा सरासरी तापमान ३६ अंश सेल्सियसपर्यंत वाढेल असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ऐन मे महिन्यात तापमानात मात्र दिलासा दिसून येणार आहे.