ठाणे: शहरात शुक्रवारपर्यंत करोनाचे दहा रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. दरम्यान, करोना रुग्णांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच सर्व रुग्णालयांनी सतर्क रहावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तसेच, कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.

पाच वर्षांपुर्वी सर्वत्र थैमान घातलेल्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या तीन वर्षांपुर्वी आटोक्यात येऊन रुग्ण संख्या शुन्यावर आल्याचे चित्र असतानाच, ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाचे गुरुवारपर्यंत सात रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली होती. त्यापाठोपाठ, शुक्रवारी आणखी तीन रुग्णांची यात भर पडली आहे. त्यामुळे शहरातील करोना रुग्णाची संख्या दहा इतकी झाली आहे.

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत महापालिका क्षेत्रातील करोना रुग्ण स्थितीची माहिती घेतली. आढळून आलेल्या करोना रुग्णांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे आढळली असून त्या सर्व रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्य वैद्यकिय अधिकारी चेतना नितील यांनी या बैठकीत दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचबरोबर, सर्व आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध असून तेथे टेस्टिंग कीटही आहेत, असेही त्यांनी सांगितले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात करोनाच्या रुग्णांसाठी १९ खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली. आरटीपीसीआरची सुविधाही कळवा येथे उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.