डोंबिवली : अगोदर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव भागातील तुकारामनगर मधील दहा तरूणांच्या टोळक्याने राजाजी रस्त्यावर रेल्वेच्या वाहनतळावर वाहन नियंत्रक म्हणून काम करणाऱ्या एका ३७ वर्षाच्या नियंत्रकाला लाथाबुक्के, स्टम्प, लोखंडी सळयांनी रविवारी रात्री बेदम मारहाण करून त्यांच्यावर चाकू हल्ला केला.
या हल्ल्याप्रकरणी रेल्वे वाहनतळ व्यवस्थापक आणि आजदे गावातील रहिवाशी दिलीप साळवे (५५) यांनी रामनगर पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार केली आहे. सागाव येथे राहणारे वाहनतळावरील वाहन नियंत्रक सुरज वाघरी (३७) या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणात कुणाल परब, प्रणव सावंत आणि इतर दहा जणांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
वाहनतळ व्यवस्थापक दिलीप साळवे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीनुसार, सुरज वाघरी आणि आकाश, अमित वाघरी असे भाऊ आहेत. सुरज आपल्या वाहनतळावर नोकरी करतो. सुरजचा भाऊ आकाश वाघरी आणि आयरेगाव तुकारामनगर भागातील काही तरूणांचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. या वादातून विनायक, कुणाल परब, प्रणव सावंत आणि इतर दहा जण रविवारी साडे बारा वाजण्याच्या दरम्यान डोंबिवली पूर्वेतील राजाजी रस्त्यावरील स्वामी नारायण मंदिराजवळील रेल्वेच्या वाहनतळावर आकाश भेटेल या आशेने हातात दांडके, स्टम्प, चाकू घेऊन दुचाकीवरून आले. याठिकाणी सुरज वाघरी कर्तव्य बजावत होता.
टोळक्याने आकाश वाघरी, ओमकार बाबत विचारणा केली, त्यावर सुरजने माहिती नाही असे उत्तर दिले. टोळक्यातील एका तरूणाने सुरज यांना नाव विचारले, सुरज वाघरी असे नाव सांगताच हाच आकाशचा भाऊ आहे असा विचार करून आकाश वाघरीचा राग सुरज वाघरी यांच्यावर टोळक्याने काढण्यास सुरूवात केली. दहा जणांनी सुरज यांना वाहनतळावरील दालनात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्यावर लाकडी दांडके, स्टम्पन प्रहार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांना दालनाच्या बाहेर खेचून त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सूरज वाघरी गंभीर जखमी झाले. वाहनतळावरील सीसीटीव्ही कॅमेरे, वीज वाहक तारा टोळक्याने तोडल्या. वाहनतळावरील काही दुचाकी वाहनांची तोडफोड टोळक्याने केली, असे तक्रारीत म्हटले आहे.
रात्री साडे बाराची वेळ असल्याने सुरज यांच्या बचावासाठी कोणी पुढे आले नाही. काही वाहन चालक वाहनतळावर वाहने नेण्यासाठी आले. त्यांना सुरज यांना वाचविण्यास पुढे आलातर तुम्हाला मारून टाकू, अशी धमकी टोळक्याने देऊन दहशत निर्माण केली. या मारहाणीनंतर टोळके पळून गेले. शास्त्रीनगर रुग्णालयात सुरज वाघरी यांच्यावर उपचार करण्यात आले. रामनगर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.