तीन महिन्यांत एक हजारांहून अधिकजण कायदेशीर विवाह बंधनात
पूर्वा साडविलकर
ठाणे : करोना प्रादुर्भाव, विवाह सोहळय़ाच्या उपस्थितीवर आलेली मर्यादा तसेच करोनामुळे निर्माण झालेली आर्थिक चणचण यामुळे गेल्या काही काळापासून जोडप्यांचा कल हा नोंदणीकृत पद्धतीने विवाह करण्याकडे वाढू लागल्याचे दिसू लागले आहे. ठाणे जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत एकूण १,१७४ जोडपी नोंदणीकृत पद्धतीने विवाह बंधनात अडकल्याची नोंद ठाणे दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात करण्यात आली आहे. करोना प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून सर्वजण निर्बंध आणि शिथिलता या प्रकियेत सापडले आहेत. यामुळे विवाह सोहळा पार पाडण्यावरही निर्बंध आले असून मागील वर्षी अनेक विवाहांचे मुहूर्तही चुकले तर अनेकांना विवाह पुढे ढकलावे लागले आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या कालावधीत ठाणे दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात ४४४ जोडपी नोंदणी पद्धतीने विवाह बंधनात अडकल्याची नोंद होती.
यंदाच्या करोना प्रादुर्भाव ओसरल्यानंतर राज्य शासनाने विवाह सोहळय़ासाठी बंदिस्त सभागृहात १०० तर, मोकळय़ा मैदानात २५० नागरिक किंवा क्षमतेच्या २५ टक्के उपस्थितीची परवानगी दिली आहे. त्यामुळे काहीजण थाटामाटात विवाह करत आहे. तर टाळेबंदीत आर्थिक गणित कोलमडल्याने आणि वाढत्या करोना प्रादुर्भावामुळे संसर्गाची भीती कायम असल्यामुळे काही जण नोंदणी पद्धतीने विवाह करण्यास प्राधान्य देत आहे. या वर्षी विवाहाचे सर्वाधिक मुहूर्त असून आतापर्यंत अनेकजण विवाह बंधनात अडकले आहेत. ठाणे दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात सद्यस्थितीला दिवसाला ५० ते ५५ विवाह पार पडत असून ठाणे जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या कालावधीत १,१७४ जणांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे, अशी माहिती ठाणे दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयाने दिली.
करोना प्रादूर्भावामुळे विवाह सोहळय़ावरही निर्बंध आले असून कमी पाहूण्यांच्या उपस्थितीत थाटामाटात विवाह पार पाडणे अनेकांना आर्थिक दृष्टीने खर्चीक वाटत आहे. त्यामुळे नोंदणीकृत पद्धतीने विवाह करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
– पार्वती काळपगार, विवाह अधिकारी ठाणे