डोंबिवली – ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यातून मागील आठ महिन्यापूर्वी पोलीस उपायुक्तांच्या विशेष शाखेने तडीपार केलेला डोंबिवली जवळील पिसवली भागातील टाटा पाॅवर भागात राहणारा गुंड श्रीराम शांताराम राठोड (२५) पोलिसांची नजर चुकवून पुन्हा डोंबिवलीत आला होता. तो हातात कोयता घेऊन टाटा पाॅवर ते डोंबिवली घरडा सर्कल रस्त्यावर पादचाऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करत होता. या गुंडाची माहिती मिळताच कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने गुंड श्रीराम राठोडला अटक केली आहे.

त्याच्या जवळील सतरा इंच लांबीचा धारदार कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. पिसवली, टाटा पाॅवर भागात श्रीराम राठोडची प्रचंड दहशत होती. अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्या दहशतीने परिसरातील रहिवासी त्रस्त होते. गुंड श्रीराम राठोड विषयीच्या वाढत्या तक्रारी येऊ लागल्यानेे स्थानिक पोलिसांनी त्याला तडीपार करण्या विषयीचा अहवाल वरिष्ठांना पाठविला होता. गेल्या वर्षी या अहवालावरून पोलिसांच्या विशेष शाखेने जानेवारीमध्ये त्याला ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातून हद्दपार केले होते.

हद्दपारीनंतर गुंड श्रीरामला डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात वावर करण्यास मज्जाव होता. तरीही श्रीराम पोलिसांची नजर चुकवून डोंबिवली परिसरातील त्याचे राहत घर असलेल्या टाटा पाॅवर आशा किरण स्टोअर्स परिसरात फिरत होता. हद्दपार असुनही गुंड श्रीराम या भागात फिरत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत होते. गेल्या आठवड्यात श्रीराम राठोड याने संध्याकाळच्या वेळेत धारदार कोयता घेतला. तो टाटा पाॅवर पिसवली ते डोंबिवली घरडा सर्कल रस्त्यावर फिरू लागला. तो पादचाऱ्यांना धारदार कोयत्या धाक दाखवून त्यांच्या अंगावर धाऊ लागला. वाहनांना आडवे येऊ लागला.

त्याची माहिती कल्याण गु्न्हे शाखेच्या पथकाला समजली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना गुंड श्रीराम राठोडच्या दहशतीची माहिती समजल्यावर त्यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, हवालदार प्रवीण किनरे, सुदाम जाधव यांच्या पथकाला टाटा पाॅवर डोंबिवली रस्त्यावर जाण्याचे निर्देश दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुन्हे शाखेचे पथक टाटा पाॅवर ते डोंंबिवली रस्त्यावर खासगी वाहनाने पोहचले. त्यावेळी त्यांना रस्त्याला एक तरूण हातात धारदार कोयता घेऊन फिरत असल्याचे आणि पादचाऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या अंगावर धावत असल्याचे आढळून आले. श्रीरामच्या हातात कोयता होता. त्यामुळे त्याच्या अंगावर थेट गेले तर तो हल्ला करण्याची आणि पळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलीस पथकाने त्याला पहिले चारही बाजुने घेरले. त्याला गाफील ठेऊन एकावेळी त्याच्यावर अचानक झडप घालून त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडील कोयता पहिले काढून घेण्यात आला. त्याच्या अटकेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. ठाणे जिल्ह्यात शस्त्र सार्वजनिक शस्त्र वापरण्यास ठाणे पोलीस आयुक्तांचा मनाई आदेश आहे. त्याचे उल्लंघन गुंड राठोडने केले होते. राठोडला अटक करून त्याच्यावर शस्त्र आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याने हवालदार प्रवीण किनरे यांनी गुन्हा दाखल केला.