scorecardresearch

उल्हासनगरः उल्हासनगरात ठाकरे गटाला धक्का, ‘राजेंद्र चौधरी’ बाळासाहेबांची शिवसेनेच्या वाटेवर

उल्हासनगर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

उल्हासनगरः उल्हासनगरात ठाकरे गटाला धक्का, ‘राजेंद्र चौधरी’ बाळासाहेबांची शिवसेनेच्या वाटेवर
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

जिल्हा पातळीवर पद मिळण्याची शक्यता

उल्हासनगरः उल्हासनगर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपल्या समर्थकांसह भेट घेतल्याने ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. लवकरच हा अधिकृत प्रवेश सोहळा संपन्न होऊन चौधरी यांना जिल्हा पातळीवर पद देण्याची शक्यता व्यक्त होते आहे. चौधरी यांच्या शिंदे गटात होणाऱ्या प्रवेशाने ठाकरे गटात हाताच्या बोटावर मोजण्याइतके जुने पदाधिकारी शिवसेनेत उरले आहेत.

उल्हासनगर शहरात शिवसेनेचा आणि त्यातही एक मराठी आक्रमक चेहरा म्हणून शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्याकडे पाहिले जात होते. शिवसेनेनी अनेक वर्षे एकनिष्ठ असलेले चौधरी दशकभराहून अधिक काळ शहराचे शहरप्रमुखपद भूषवत होते. शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणे टाळले होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्यावरही या हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप झाला होता. त्यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात राहणे पसंत केले होते. मात्र दोनच दिवसांपूर्वी राजेंद्र चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांचे काही समर्थक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारीही सोबत होते. त्यामुळे चौधरी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा >>> ठाण्यात भाजपा कार्यकर्त्यांकडून पाकिस्तानच्या ध्वजाचे दहन

चौधरी यांच्या शिंदे गटात जाण्याने उद्धव ठाकरे गटाला शहरात मोठा फटका बसेल असे मानले जाते. चौधरी शिवसेनेचे नेतृत्व अनेक वर्षांपासून करत असून शहरातील जुना चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर चौधरी यांच्या प्रवेशाने पक्षाला फायदा होईल अशी आशा आहे. मात्र बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेतृत्व सध्या राजेंद्रसिंह भुल्लर यांच्याकडे असून त्यामुळे चौधरी यांना जिल्हा पातळीवरील जबाबदारी दिली जाईल, अशी शक्यता व्यक्त होते आहे.

हेही वाचा >>> ठाणे: फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची १०० टक्के रक्कम परत मिळणार; पोलिसांनी केलेल्या तपासाचे सर्वत्र कौतुक

नक्की झाले काय

दोनच दिवसांपूर्वी एका प्रकरणात राजेंद्र चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. जमिन व्यवहाराच्या या प्रकरणात चौधरी यांना दहा तासांहून अधिक काळ पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळते आहे. खुद्द चौधरी यांनी पोलिसांनी सुटका केल्यानंतर याबाबत खुलासा केला. मात्र ही कारवाई कोणत्याही राजकीय दबावातून झाल्याची शक्यता वाटत नाही अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी दिल्याने आश्चर्य व्यक्त होऊ लागले होते. त्यानंतर काही तासातच चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे या दोन्ही घटनांचा एकत्रितपणे अर्थ लावला जातो आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 18:22 IST

संबंधित बातम्या