ठाणे : तुमचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार होता. परंतु मी पुन्हा तुम्हाला आणले. मी जर तुम्हाला आणले नसते तर काँग्रेसमध्ये तुम्हाला फडका मारायला देखील ठेवले नसते अशी टीका ठाकरे गटाने नेते राजन विचारे यांनी शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यावर केली.शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिंदे गटाने आंदोलन केले होते.

या आंदोलनानंतर ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी गुरुवारी रात्री पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी विचारे यांनी म्हस्के यांच्या कथित काँग्रेस प्रवेशाचा मुद्दा काढून त्यांच्यावर टीका केली. तुमचा काँग्रेसमध्ये प्रवेश होता. तुमचा जर काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असता फडका मारायला पण ठेवले नसते.

तुम्ही पहिल्यांदा माझे आभार माना, नंतर बाकीच्यांचे माना अशी टीका राजन विचारे यांनी म्हस्के यांच्यावर केली. यावेळी त्यांनी उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना झाला. त्याच्यावरती यांचे तोंड बंद होते. त्यावेळेला खऱ्या अर्थाने जर हिंदुत्व म्हणता तुम्ही तर तुमचे हिंदुत्व गेले कुठे? असा आरोप विचारे यांनी शिंदे गटावर केला.

ठाणे महापालिका यांच्यामुळे डबगाईला

ठाणे महापालिका एवढी डबगाईला झालेली आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार ही मंडळी आहेत. ठाणे महापालिकेची अवस्था वाईट झालेली आहे. आज ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी होते आणि लोक रस्त्यावर येतात. आजसुद्धा ठाण्यात अवजड वाहने रस्त्यावर दिसत आहेत.मी पक्षात गेलो नाही म्हणून दिघे साहेबांच्या स्मारकाचा प्रकल्प रद्द – दर निवडणुकीला दिघे साहेबांचा विषय काढायचा आणि वेगवेगळ्या दिशा भूल करायची. ठाणे जिल्ह्याच्या दैवत आनंद दिघे यांचे स्मारक छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणार होते. पण स्मारकाचा प्रकल्प रद्द केला. याचे कारण म्हणजे, मी त्यांच्या पक्षात गेलो नाही म्हणून.. असेही ते म्हणाले.

दिघे साहेब असते तर चाबकाने फोडले असते

दिघे साहेब कशा पद्धतीने काम करायचे हे ठाण्याला माहित आहे. दिघे साहेब असते तर ही गद्दारी झाली नसती. यांना साहेबांनी चाबकाने फोडले असते. त्यांना आणि त्यांची हिंमत सुद्धा झाली नसती. दिघे साहेब आहेत, ते यांना नक्की धडा शिकवतील असेही विचारे म्हणाले.