डोंबिवली – थॅलेसेमिया आजाराविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी. थॅलेसेमिया बाधित रूग्णांना तात्काळ मुंबई, ठाणे परिसरात न जाता स्थानिक पातळीवर वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावेत या विचारातून ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ या रोटरी मंडलाच्या ३१४२ गटाने येथील सामाजिक कार्यातील आश्रय चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयाच्या सहकार्याने डोंबिवली एमआयडीसीत थॅलेसेमिया नियंत्रण केंद्र सुरू केले आहे.
डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसीमधील अभिनव बँके शेजारील आश्रय चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयाच्या साहाय्याने रोटरी मंडलाने हा उपक्रम सुरू केला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन रोटरीचे प्रांतपाल हर्षल मकोल, माजी प्रांतपाल आणि ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डाॅ. उल्हास कोल्हटकर, आश्रय ट्रस्टचे नरसिंह हेगडे, रोटरी क्लब डोंबिवली ईस्टचे अध्यक्ष डाॅ. संदीप घरत, आश्रय ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ. अरूण पाटील, विभागीय समन्वयक डाॅ. माधव बैतुले, रोटरी प्रांताचे प्रकल्पप्रमुख जितेंद्र जाधवानी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
पोलिओ निर्मूलनासाठी रोटरीने मागील चार दशके ज्या समर्पित भावाने अथक प्रयत्न केले आणि पोलिओचे उच्चाटन केले. त्याप्रमाणे रोटरी मंडल थॅलेसेमिया नियंत्रणासाठी तेवढ्याच ताकदीने आणि समर्पित भावाने काम करणार आहे, असे रोटरीचे प्रांतपाल हर्षल मकोल यांनी यावेळी सांगितले.
थॅलेसेमिया नियंत्रण आणि निवारणासाठी रोटरीने जनजागृती, रक्त संकलन, रक्त संक्रमण, निधी उभारणे, निदानासाठी सुविधा उपलब्ध करून देणे हा पंचसूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. थॅलेसेमिया बाधित मुलांचे शिक्षण, पुनर्वसन, त्यांच्या पुढच्या जीवनाची वाटचाल हे सर्व करत असताना माहिती आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर कसा करता येईल यादृष्टीने पावले टाकण्याचा महत्वपूर्ण निर्णय रोटरीने घेतला आहे, असे माजी प्रांतपाल डाॅ. उल्हास कोल्हटकर यांंनी सांगितले.
यापूर्वी नवी मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर येथे थॅलेसेमिया निवारण केंद्र सुरू होती. आता रोटरी आणि आश्रय ट्रस्ट रुग्णालयाच्या पुढाकाराने डोंबिवली एमआयडीसीत हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी बाधित बालकांना मोफत उपचार आणि समुपदेशन केले जाणार आहे, असे डाॅ. कोल्हटकर यांनी सांगितले.
बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त मिळविण्यासाठी धावपळ करण्यास लागू नये. त्यांना एक खिडकी पध्दतीने तात्काळ रक्त उपलब्ध व्हावे यासाठी पालिकेच्या डोंंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील चिदानंद ट्रस्ट रक्तपेढीशी हा प्रकल्प संलग्न करण्यात आला आहे, असे डाॅ. कोल्हटकर यांनी सांगितले. रोटरीच्या या सर्व उपक्रमाला आश्रय चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालय पूर्ण क्षमतेने सहकार्य करील, असे आश्रय ट्रस्टचे डाॅ. अरूण पाटील यांनी सांगितले. या केंद्राची सुरूवात झाल्यानंतर उपस्थितींच्या समोर एका थॅलेसेमिया रुग्णाचे रक्त संक्रमण करण्यात आले.
